अनिकेत साठे, नाशिक

लोकसभा निवडणुकीत जिल्ह्य़ात सलग दुसऱ्या पंचवार्षिकात दाणादाण उडाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीवर त्याचा प्रभाव राहण्याची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीच्या गोटात असून प्रस्थापितांपुढे आपले गड राखण्याचे आव्हान आहे. शिवसेना-भाजपसमोर बंडखोरांच्या फोफावणाऱ्या उदंड पिकाचा प्रश्न उभा ठाकण्याची शक्यता आहे. युती झाली तरी जागावाटपात काही जागांवर संघर्ष अटळ आहे. भाजपचे आयत्यावेळी येणाऱ्यांना पायघडय़ा घालण्याचे धोरण आणि पुन्हा संधी मिळेल की नाही, या चिंतेने विद्यमान आमदारांसह इच्छुकांमध्ये अस्वस्थता आहे.

जिल्ह्य़ात विधानसभेच्या १५ जागा असून मागील निवडणुकीत भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांची ताकद थोडय़ाफार फरकाने समान राहिली होती. सेना, भाजपच्या ताब्यात प्रत्येकी चार मतदारसंघ आहेत. राष्ट्रवादीकडे चार, काँग्रेसच्या हाती दोन आणि माकपचे एका मतदारसंघात आमदार आहे. पाच वर्षांत स्थानिक राजकारणाचा पोत पूर्णपणे बदलला. नाशिक महापालिकेवर भाजपने एकहाती सत्ता मिळवली. जिल्हा परिषदेवर शिवसेनेने काँग्रेसच्या मदतीने भगवा फडकवला. या काळात भाजपने स्वतंत्रपणे निवडणुका लढवत ग्रामीण भागात हातपाय पसरले. जिल्हा बँकही ताब्यात घेतली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विधानसभेच्या १३ मतदारसंघात सेना-भाजप युतीने वर्चस्व प्रस्थापित केले. आघाडीचा दिंडोरी, मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघ वगळता कुठेही निभाव लागला नाही. नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदार संघातील दणदणीत पराभवाने छगन भुजबळ, पंकज भुजबळ, जिवा पांडू गावित या प्रस्थापित आमदारांना हादरे बसले. पराभवाच्या मालिकांमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सैरभैर असून त्यांचा उत्साह लोप पावला आहे. काँग्रेसच्या कधी तरी होणाऱ्या आंदोलनात बोटावर मोजता येतील, इतकेच नेते असतात. कार्यकर्ते शोधूनही सापडत नाहीत.

येवल्यामधून भुजबळांच्या उमेदवारीस त्यांचेच सहकारी आव्हान देऊ लागले आहेत. वाऱ्याची दिशा पाहून आघाडीतील काही नेते सेना-भाजपकडून उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. गत वेळी विधानसभेच्या आखाडय़ात सर्वच पक्ष स्वतंत्रपणे उतरले होते. त्यामुळे सेना-भाजपला आपल्या इच्छुकांना जास्तीत समाधानी करणे शक्य झाले. या वेळी जाहीर केल्याप्रमाणे युती झाल्यास तसे समाधान करता येणार नाही. लोकसभा निकालामुळे इच्छुकांच्या महत्त्वाकांक्षा प्रबळ झाल्याने त्यांची संख्याही वाढली आहे. काही जण वर्षभरापासून विधानसभेची तयारी करीत आहेत. भाजपचे काही पदाधिकारी नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, नाशिक मध्य मतदारसंघात विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाईल, या आशेवर कामाला लागले आहेत. सेनेतील इच्छुकांनी तिथे मोर्चेबांधणी केली आहे. आदित्य ठाकरे यांची ‘जन आशीर्वाद यात्रा’ त्या मतदारसंघात नेऊन अप्रत्यक्ष दावेदारी करण्यात आली. सेनेच्या ताब्यातील काही जागांवर वेगळी स्थिती नाही. तेथे भाजप पदाधिकारी बंडखोरीच्या तयारीत आहेत. ही बंडखोरी थोपवताना सेना-भाजप नेत्यांची दमछाक होणार आहे.

शिवसेनेकडे देवळाली, मालेगाव बाह्य़, निफाड, सिन्नर, तर भाजपकडे नाशिकमधील पूर्व, पश्चिम, मध्यसह चांदवड हे मतदारसंघ आहेत. उमेदवार निवडीत भाजपचा फाम्र्युला सेना वापरणार नाही. युतीवर शिक्कामोर्तब झाल्यास ताब्यातील मतदारसंघ कोणीही सोडणार नाही. तुटेपर्यंत ताणायचे नसल्यास एखाद्या मतदारसंघाबाबत तडजोड केली जाऊ शकते. अन्यत्र मागील निकालासह सध्याच्या ताकदीचा विचार होईल. त्यात काही मतदारसंघांत मतभेदाची शक्यता आहे. नांदगाव हा त्यापैकीच एक. गेल्या वेळी सेना-भाजपचे मत विभाजन राष्ट्रवादीच्या पंकज भुजबळांच्या पथ्यावर पडले होते. त्या वेळी सेना, भाजपच्या मतांमध्ये एक हजारापेक्षा कमी अंतर होते. अशा काही जागा लढविण्याची तयारी दोन्ही पक्षांनी केली आहे. भाजपच्या हालचाली लक्षात घेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नांदगावला भेट देत पीक विम्याच्या प्रश्नावरून शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. दोन्ही पक्षांना आशा असलेल्या काही जागांवरून युतीत रस्सीखेच होऊ शकते.

विरोधकांसाठी विधानसभा निवडणुकीची परीक्षा कठीण असेल. वंचित बहुजन आघाडीने प्रत्येक मतदारसंघात आघाडीची मते घेतल्याचे लोकसभा निवडणुकीत दिसले. विधानसभेत त्याची पुनरावृत्ती होण्याची चिन्हे आहेत. मालेगाव मध्यमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीत मैत्रीपूर्ण लढत नाकारता येत नाही. राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळाल्यास गतवेळचे पराभूत उमेदवार एमआयएमचा रस्ता धरतील, असा कयास आहे. ती वेळ आल्यास या ठिकाणी काँग्रेस आघाडी विरुद्ध एमआयएम असा सामना रंगेल. येवला विधानसभेचे सलग तीन वेळा प्रतिनिधित्व करणारे छगन भुजबळ आणि नांदगावमधून दोन वेळा विधानसभेत जाणारे त्यांचे पुत्र पंकज भुजबळ यांनीही मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. हजारो शेतकऱ्यांचा नाशिक ते मुंबई मोर्चा काढून प्रकाशझोतात आलेले माकपचे जिवा पांडू गावित लोकसभा निवडणुकीत स्वत:च्या कळवण विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या स्थानी राहिले. अशीच धोक्याची घंटा आघाडीच्या ताब्यातील बहुतांश मतदारसंघांत वाजली आहे. विधानसभेच्या २००९ मधील निवडणुकीत मनसेने नाशिक शहरातील तिन्ही मतदारसंघ काबीज केले होते. आघाडीत स्थान मिळो अथवा न मिळो, त्या जागा लढविण्याचा मनसेचा प्रयत्न आहे. बदललेल्या राजकीय परिस्थितीत भाजप काही जागांवर इतर पक्षातील प्रबळ व्यक्तीला उमेदवारी बहाल करू शकतो. तसे होऊ नये म्हणून आधीपासून तयारी करणारी मंडळी व्यूहरचना करण्यात गुंतल्याचे चित्र आहे.

जागावाटपाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरू असून जिल्ह्य़ात कोणाला किती जागा मिळणार हे पुढील काळात स्पष्ट होईल. लोकसभेच्या निकालाचा विधानसभा निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही. कारण, २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत बहुतांश ठिकाणी युतीने आघाडी घेतली होती. तथापि, नंतर विधानसभा निवडणुकीत काही मतदारसंघांत राष्ट्रवादीने मोठय़ा फरकाने विजय मिळवला होता. आघाडीबाबत मनसेचा प्रस्ताव अद्याप आलेला नाही.

– छगन भुजबळ, आमदार, येवला मतदारसंघ

जिल्ह्य़ातील राजकीय चित्र

’ नाशिक मध्य – भाजप

’ नाशिक पश्चिम – भाजप

’ नाशिक पूर्व – भाजप

’ चांदवड – भाजप

’ देवळाली -शिवसेना

’ मालेगाव बाह्य़ – शिवसेना

’ निफाड – शिवसेना

’ सिन्नर – शिवसेना

’ येवला – राष्ट्रवादी

’ नांदगाव – राष्ट्रवादी

’ दिंडोरी – राष्ट्रवादी

’ बागलाण – राष्ट्रवादी

’ मालेगाव मध्य – काँग्रेस

’ इगतपुरी -काँग्रेस

’ कळवण – मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष