News Flash

कमी भावामुळे भात उत्पादक निराश

तालुक्यात यंदा मागील वर्षीच्या तुलनेत समाधानकारक पाऊस झाला.

इगतपुरी तालुक्यात ठिकठिकाणी सुरू असलेली भाताची कापणी.

तांदूळ दराचा स्तर मात्र वाढता
इगतपुरी तालुक्यातील प्रमुख पीक असलेल्या भाताची कापणी अंतिम टप्प्यात असून त्याची घोटी बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात आवक होत असल्याने भाव कोसळले आहेत. घोटी बाजारपेठेत तालुक्यासह लगतच्या त्र्यंबकेश्वर, खोडाळा, सिन्नर, अकोले आदी भागांतून दररोज लाखो क्विंटल भात विक्रीसाठी येत आहे. बाजारात तांदळाच्या किमती वाढीव स्वरूपाच्या असूनही व्यापारी भाताची खरेदी कमी दराने करीत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. भाताच्या हमी भावासाठी शासनाने लक्ष द्यावे तसेच भात खरेदीसाठी एकाधिकार धान्य योजना सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
तालुक्यात यंदा मागील वर्षीच्या तुलनेत समाधानकारक पाऊस झाला. हा पाऊस भात पिकाला पोषक ठरल्याने गतवर्षीच्या तुलनेत यंदा भाताचे चांगले पीक आले. त्यामुळे उत्पादनही लक्षणीयरीत्या वाढले. याचा परिणाम भावात प्रचंड घसरण होण्यात झाला आहे. असे असताना तांदळाच्या किमती मात्र स्थिर असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. भात पिकाचे विक्रमी उत्पादन असलेल्या इगतपुरीत त्यावर प्रक्रिया करणारे उद्योगधंदे उभारले गेले.
कोळपी या चवदार वाणामुळे घोटीचा तांदूळ महाराष्ट्रातील घराघरात पोहचला. विक्रमी उत्पादन असल्याने घोटी शहरातील प्रक्रिया करणाऱ्या लघुउद्योगांची जागा हळूहळू भात मिलने घेतली. यामुळे भाताची खरेदी करणारा एक मोठा व्यापारी वर्ग शहरात निर्माण झाला. या व्यापाऱ्यांवर भाताच्या हमी भावाबाबत शासनाचा अंकुश नसल्याने मनमानीपणे व व्यापाऱ्यांच्या मर्जीने भाताचा भाव निश्चित केला जातो.
शासन तसेच खरेदी-विक्री संघ आणि आदिवासी विकास महामंडळाची भात खरेदी अनेक वर्षांपासून बंद असल्याने कर्जात बुडालेल्या शेतकऱ्यांना नाइलाजास्तव व्यापाऱ्यांना मातीमोल भावाने भाताची विक्री करावी लागते. तालुक्यातील शेतकऱ्यांची ही व्यथा समोर दिसत असतानाही याबाबत सर्वच राजकीय पक्षांनी मौन बाळगले आहे. राजकीय पदाधिकाऱ्यांच्या मौनाचे कारण काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कमी भावाने भाताची खरेदी करून शेतक ऱ्यांची लूट व पिळवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर शासनाने अंकुश ठेवण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
स्थानिक भातापेक्षा परराज्यातून येणाऱ्या मसुरी व कर्नाटक या भाताला व्यापाऱ्यांची अधिक पसंती असल्याने स्थानिक भाताला दुय्यम स्थान दिले जाते. भाताला हमी भाव मिळावा, ८० किलोच्या मापाने भाताची खरेदी करावी या मागणीसाठी मनसेने केलेल्या आंदोलनाची दखल घेत भाताची खरेदी करण्यात येत होती; परंतु पुन्हा शेतकऱ्यांच्या भाताची कवडीमोल दराने खरेदी करण्यात येत असून ही गंभीर बाब आहे. त्यात शासनाने लक्ष देणे आवश्यक असून मनसे या प्रश्नावर रस्त्यावर उतरेल, असा इशारा संदीप कर्वे यांनी दिला आहे.

व्यापाऱ्यांकडून खरेदी होणाऱ्या भाताचे भाव (८० किलोसाठी)
इंद्रायणी – १४०० ते १५०० रुपये (गतवर्षीचा भाव १४००), होम ३ – १४०० (१२२५), दप्तरी – १४५० (१२२५), आर २४ -१४०० (१२००), पूनम हळी – ११०० (१०७५), सुहासिनी – ११०० (१०७५), रुपाली – १३०० (१२००), गावठी हळी – १००० (९००), सोनम १३५० (१२५०)

तांदळाचे भाव (प्रति क्विंटल)
इंद्रायणी- ३५०० रुपये, होम थ्री – ३१००, दप्तरी – ३१००, आर २४ – ३३००, पूनम हळी- २६००, सुहासिनी – ३५००, गावठी हळी – २२००, सोनम ३५०० रुपये तर रुपाली तांदळापासून मुरमुरे तयार केले जातात.

हमीभाव देऊन एकाधिकार योजना राबवावी
भाताला हमीभाव मिळावा यासाठी आपण सातत्याने शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, तालुक्यातील भाताची शासनाने एकाधिकार धान्य खरेदी योजनेतून खरेदी करावी तसेच आदिवासी विकास महामंडळाने भात खरेदी करावी यासाठी पाठपुरावा केला जात आहे.
– आमदार निर्मला गावित

कवडीमोल भावाने विक्री
भात लागवडीसाठी सावकार व बँकेकडून कर्ज घेऊन प्रचंड रोगराईतून हातातोडांशी आलेल्या या पिकावर हे कर्ज फेडण्याची भिस्त असते. परंतु घोटीसारख्या मोठय़ा बाजारपेठेत त्यास भाव मिळत नसल्याने नाइलाजास्तव कवडीमोल भावाने भाताची विक्री करावी लागते. भाताचा हमीभाव ठरविण्यासाठी शासन लक्ष देत नसल्याने खरेदी करणारे मनमानी भाव देतात. त्यात शेतकऱ्यांचे नुकसान होते.
– भगवान घारे, शेतकरी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2015 1:04 am

Web Title: rice producer discouraged were low price detection
Next Stories
1 छठपूजा उत्साहात मनसे मात्र निरुत्साहात
2 पोलिसांच्या सायकल गस्तीला सिंहस्थ निधीचा आधार
3 विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांचे दिंडी आंदोलन
Just Now!
X