प्रवासातील महिलांची सुरक्षितता ऐरणीवर

घरी जाण्यासाठी वाहनाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या महिलेला रिक्षात बसवून चालकाने मारहाण करत तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. सहा दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेची भयभीत झालेल्या महिलेने कुठेही वाच्यता केली नाही. सोमवारी संशयित रिक्षाचालकाने पुन्हा तिला गाठण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पीडितेने कशीबशी सुटका करून घेत कुटुंबीयांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. या घटनेमुळे रिक्षातून होणाऱ्या महिलांच्या प्रवासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

एसटी महामंडळाने शहरात बसच्या फेऱ्या कमी केल्यामुळे महिनाभरापासून रिक्षाचालकांचा मनमानी कारभार सुरू आहे. बस उपलब्ध नसल्याने शालेय विद्यार्थी, महिला व नागरिकांना प्रवासासाठी रिक्षाचा आधार घेणे भाग पडते. ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता कन्नमवार पुलालगत वाहनाच्या प्रतीक्षेत पीडित महिला थांबली होती. आडगाव नाका येथे घरी जाण्याकरिता महिलेने त्या दिशेने जाणाऱ्या एका रिक्षाला हात दिला. रिक्षा थांबल्यानंतर चालक मद्यधुंद अवस्थेत आढळला. त्यामुळे महिला रिक्षातून जाण्यास तयार नसल्याने चालकाने पुढे आणखी प्रवासी घेईल असे सांगून तिला रिक्षात बसविले. रस्त्यात अन्य प्रवासी न बसविता चालकाने रिक्षा थेट पंचवटी डेपोलगतच्या मोकळ्या जागेत नेली. अंधारात महिलेला बेदम मारहाण केली. रिक्षातून गज काढून मारला. या मारहाणीने महिला बेशुद्ध पडल्यानंतर चालकाने अत्याचार केला. रात्री नऊच्या सुमारास महिला शुद्धीत आल्यावर कशीबशी घरी परतली, परंतु भीतीपोटी तिने याबद्दल कुठेही वाच्यता केली नाही.

मोलमजुरीचे कामे करून सोमवारी नेहमीप्रमाणे पीडिता उपरोक्त भागातून जात असताना त्याच रिक्षाचालकाने पुन्हा अडविले. तिला रिक्षात बसविण्याचा प्रयत्न केला. यामुळे धास्तावलेल्या महिलेने स्वत:ची सुटका करून घेत घर गाठले. कुटुंबीयांना संपूर्ण घटनाक्रमाची माहिती दिली. नंतर संबंधितांनी रात्री पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेतली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा दाखल करत पोलिसांनी पीडितेकडून मिळालेल्या वर्णनावरून रिक्षाचालकाचा शोध सुरू केला. मंगळवारी सकाळी संशयित चालक राजेंद्र महेंद्रसिंग रावत (३९, हिरावाडी) याला ताब्यात घेण्यात आले.

रिक्षाचालकांची मुजोरी

सायंकाळी अतिशय वर्दळीच्या परिसरात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. शहरात रिक्षाचालकांची दादागिरी सर्वज्ञात आहे. बाहुबली नेते पाठीशी उभे राहत असल्याने रिक्षाचालक वाहतूक पोलिसांनादेखील जुमानत नाहीत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा प्रयत्न केल्यास रिक्षाचालकांनी अनेकदा वाहतूक पोलिसांना मारहाण केल्याचे प्रकार घडले आहे. शहरी बस कमी झाल्यामुळे महिला व युवतींनाही रिक्षाने प्रवास करणे क्रमप्राप्त ठरले आहे. या स्थितीत असे प्रकार घडू लागल्यास महिला प्रवाशांची सुरक्षितता कशी राखली जाईल, अशी धास्ती व्यक्त केली जात आहे.