शहरात रिक्षाचालकांच्या वाढत्या मुजोरीने प्रवाशी हैराण झाले आहेत. प्रवाशांशी असभ्य भाषेत बोलणे, भरधाव रिक्षा नेणे, पोलिसांनादेखील मारहाण करणे असे अनेक प्रकार शहरात घडत आहेत. वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या या रिक्षाचालकांची मुजोरी नियंत्रणात कशी आणणार, असा प्रश्न प्रवाशांना पडला असून रिक्षातून प्रवास करणे प्रवाशांना भीतीदायक झाले आहे.

रिक्षाचालकांचा जाच दिवसाही नागरिकांना निमूटपणे सहन करावा लागतो. शहर बस वाहतुकीचे थांबे आपलीच मालमत्ता असल्याच्या थाटात रिक्षाचालकांचा कब्जा असतो. एसटी बसचालकांनी काही जाब विचारण्याचा प्रयत्न केल्यास समस्त रिक्षाचालक एकत्रितपणे त्यांनादेखील मारहाण करण्यास मागेपुढे पहात नाही, असा अनुभव आहे.

या स्थितीत रिक्षाचालकांची अरेरावी व माज कसा असतो याची अनुभूती पुन्हा सीबीएस ते गरवारे असा प्रवास करणाऱ्या महिलांसह पुरुष प्रवाशांनी घेतली. सीबीएसलगत अंबड व गरवारेकडे जाण्यासाठी थांबा आहे.

रविवारी रात्री ९ वाजता या ठिकाणी उभ्या असणाऱ्या सहा आसनी रिक्षात दोन-तीन महिला व अन्य काही प्रवासी बसले होते. चालकाला आणखी एक-दोन प्रवाशांची प्रतीक्षा होती. या काळात दोन मद्यपी चालक तिथे आले. त्यांनी आम्ही आधीपासून रिक्षा क्रमांकात उभे असताना, तू प्रवासी कसे भरले, असा जाब विचारत वाद घातला. चालकाला मारहाण करत सर्व प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले. संबंधित चालकाने आपला क्रमांक असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला; परंतु मद्यपी चालकांनी त्यास जुमानले नाही. लगत दुसरी रिक्षा उभी होती. सर्व प्रवासी त्या चालकाकडे पाहून रिक्षात जाऊन बसले. तिथेही हे दोन मद्यपी चालक पोहोचले. आणखी प्रवासी घेण्याकरिता महिला प्रवाशांना विचित्र स्वरूपाचे सल्ले मद्यपींनी दिले.

लगतच्या तरुणाला ही बाब खटकली. या वेळी युवक आणि मद्यपी यांच्यात वाद झाले. त्यातच प्रवाशांनी चालकास निघण्यास सांगितले. त्या वेळी एक पोलीस कर्मचारी तिथे पोहोचला. त्या कर्मचाऱ्याला आधी घडलेल्या प्रकाराची कल्पना नव्हती. चालकाने साहेबांकडून पैसे घ्यायचे नाही, असे सांगितले.

आणखी एक प्रवासी घेतल्याशिवाय रिक्षा नेली जाणार नसल्याचा पवित्रा घेतला गेला. अखेर प्रवाशांनी एका प्रवाशाचे पैसे देण्याची तयारी दर्शविली. या वेळी संबंधित चालकाने मद्यपी चालकांना आपल्या शेजारी बसवत रिक्षा वेगात पुढे नेली.

त्र्यंबक नाका सिग्नल चुकीच्या पद्धतीने ओलांडत रिक्षा पेट्रोल पंपावर थांबविली. या वेळी एका महिलेने आमची घरी कोणी तरी वाट पाहात असून रिक्षा हळू चालविण्यास सांगितले. त्यावर चालकाने, तुम्हाला उतरायचे असेल तर उतरा, असे अरेरावीत सांगितले. या वेळी एका प्रवाशाने जिवापेक्षा काही महत्त्वाचे नसल्याचे सांगून सर्वाना उतरण्याचे आवाहन केले.

चालक अखेपर्यंत सर्वाशी असेच वर्तन ठेवले. त्याच्या रिक्षातून उतरलेल्या प्रवाशांनी दुसरी रिक्षा पकडून आपले घर गाठले. त्या वेळी प्रवाशांशी असभ्य, अरेरावीने बोलणाऱ्या अशा चालकांमुळे रिक्षा व्यवसाय बदनाम झाल्याची भावना नव्या रिक्षातील चालकाने व्यक्त केली. अशा चालकांवर कोण कारवाई करणार, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

आयुक्तालयासमोरच क्षमतेहून अधिक प्रवासी वाहतूक

दुचाकी वाहनधारकांनी हेल्मेट परिधान केले नाही म्हणून दंडात्मक कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणारे, क्षमतेहून अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांकडे सोईस्करपणे कानाडोळा केल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. अशोक स्तंभ ते गंगापूर गाव परिसरात रिक्षामध्ये इतके प्रवासी कोंबले जातात की, कोणालाही धक्का बसेल. महत्त्वाची बाब म्हणजे ही सर्व वाहतूक शहर पोलीस आयुक्तालयाच्या समोरून दिवसरात्र सुरू असते. एखाद्या प्रवाशाने धोकादायक पद्धतीने होणाऱ्या या प्रवासाला नकार दिला, नियमावली सांगितली, तर त्याला एकाही रिक्षात बसायला मिळत नाही. बससाठी तिष्ठत राहावे लागते. रिक्षाचालक अतिशय उर्मटपणे वागतात; पण बोलायची सोय नसते, असे प्रवासी सांगतात.