सकाळी सातपासून बाजार परिसर गर्दी; विक्रेत्यांकडून नफेखोरी

नाशिक : शहरासह जिल्ह्य़ात वाढणारा करोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बुधवारी दुपारपासून टाळेबंदी लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मंगळवारी नाशिककरांनी बाजारपेठेत खरेदीसाठी मोठय़ा प्रमाणावर गर्दी केली. भाजीबाजारातही खरेदीसाठी उडय़ा पडल्याने विक्र ेत्यांनीही दर वाढवून वाहत्या गंगेत हात धुऊन घेतला.

मागील अनुभव लक्षात घेता नागरिकांनी टाळेबंदीच्या भीतीने जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी केली. शहरातील शिवाजी चौक, पंचवटी, रविवार कारंजा, सातपूर, नाशिकरोड, भद्रकालीसह अन्य भागातील भाजीबाजारात एकच गर्दी झाली.

दहा दिवसांसाठी पुरेल इतका भाजीपाला खरेदी करण्याकड बहुतेकांचा कल होता. सकाळी सातपासूनच बाजार परिसर गर्दीने ओसंडून वाहण्यास सुरुवात झाली. मागणी वाढल्याने विक्रेत्यांनी किरकोळ भाजी बाजारात दर वाढवले. त्यामुळे एरवी १० ते १५ रुपये पावशेर असा भाव असणाऱ्या भाज्यांनी मंगळवारी २० रुपयांपर्यंत भाव खाल्ला. पालेभाज्या नाशवंत असल्या तरी त्याचेही भाव वाढलेले राहिले.

सुजाता कोपरकर यांनी जिल्हा प्रशासनाची नियमावली संभ्रमात टाकणारी असल्याने बटाटा, कोबी अशा टिकणाऱ्या भाज्या घेतल्याचे सांगितले.

याशिवाय डाळी खरेदी करुन भाजीचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले.

या आठवडय़ात अक्षय्यतृतीया आणि रमजान ईद हे दोन मोठे सण आहेत. या दोन्ही सणांना फळांचे अधिक महत्व आहे. अजूनही बहुतांश कुटुंबांमध्ये अक्षय्यतृतीयेपासूनच आमरसाचे जेवण करण्यास सुरुवात के ली जाते. टाळेबंदीत सर्वच बंद राहील, या भीतीने आंबे, खरबूज, टरबूज खरेदी करण्याकडे कल राहिला.

किरकोळ भाजीबाजारातील दर

टोमॅटो ४० रुपये किलो, भेंडी ४०, बटाटा  २५-३०, कांदे २०, लसूण १००, आले  ६०, हिरवी मिरची २० रुपये पावशेर, पालक १५, तांदुळका १५, शेपु १५, माठ १५, कांदा पात २०, कोबी २०-३०, फ्लॉवर २०-३०, काकडी २० रुपये किलो, बीट १० रुपये नग, भोपळा १५, गवार ६० रुपये किलो, डांगर १५ रुपये पावशेर, वांगे १५ रुपये पावशेर, वाल  २० रुपये पावशेर, लिंबू १० रुपयाला दोन, मुळा २० रुपयांत तीन किंवा पाच