दक्षिणेकडील राज्यातून वाढलेली मागणी आणि हवामानामुळे चाळीत साठविलेला माल खराब होऊ लागल्याने तो विक्रीसाठी काढण्यास प्राधान्य अशा घटनाक्रमात सोमवारी कांद्याचे दर चांगलेच उंचावले. सोमवारी सटाणा बाजार समितीत प्रति क्विंटलला सरासरी ३६०० रुपये तर लासलगाव बाजारात २८०१ रुपये भाव मिळाला.

पंधरवडय़ापासून सातत्याने चढ-उतार अनुभवणारे कांद्याचे दर आता चांगलेच वधारले आहेत. वातावरणातील बदल, साठवणुकीत येणारी अडचण यात ३० ते ४० टक्के उन्हाळ कांदा खराब झाला आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये पावसामुळे तेथील बाजारपेठेत कांद्याची आवक निम्म्याने घटली. त्या भागातून स्थानिक कांद्याला मागणी आहे. लाल कांदा बाजारपेठेत येण्यास अजून दीड ते दोन महिन्यांचा अवधी  बाकी आहे. या सर्व घडामोडींचा परिणाम घाऊक बाजारात दिसत आहे. सोमवारी लासलगाव बाजार समितीत १५ हजार क्विंटलची आवक झाली. त्यास किमान १००० ते कमाल ३२१० आणि सरासरी २८०१ रुपये भाव मिळाला. दोन दिवसांपूर्वी म्हणजे शनिवारी या बाजारात क्विंटलला सरासरी २५०१ रुपये दर मिळाले होते. सटाणा बाजार समितीत उन्हाळ कांद्याला सर्वाधिक म्हणजे सरासरी ३६०० रुपये भाव मिळाला. अतिवृष्टीमुळे यंदा अन्य राज्यातील कांदा पीक वाया गेल्याने कांद्याला भावात तेजी आली आहे. सटाणा बाजार समितीत २१ हजार क्विंटलची आवक झाली. सकाळच्या सत्रात सर्वाधिक चार हजार १७५ तर सरासरी ३६०० रुपये भाव मिळाला. या दिवशी आवकही वाढल्याचे दिसून आले. नामपूर बाजार समितीत आवारात देखील कांद्याची चांगलीच आवक होती. मात्र भावात प्रती क्विंटल आठशे रुपयांची तफावत होती. नामपूरमध्ये सरासरी भाव २९०० रुपये होता. सटाण्यात अधिक भाव असल्याने अनेक शेतकऱ्यांनी नंतर आपला कांदा नामपूर बाजार आवार सोडून सटाणा बाजारात कांदा विक्रीला आणला. सटाणा बाजार समितीत तीन दिवसात एक हजार रुपयांची भाव झाली आहे. चाळीत साठविलेल्या उन्हाळ कांदा अखेरच्या टप्प्यात वधारला असला तरी साठवणुकीत बरेचसे नुकसान झाल्याचे शेतकरी सांगतात. मनमाड बाजार समितीत उन्हाळ कांद्याच्या दरात ५४० रुपयांनी वाढ झाली. शनिवारी २४०० रुपये प्रति क्विंटलवर असलेले दर सोमवारी २९४० रुपयांवर पोहोचले.