अनिकेत साठे

जगात करोनाचा प्रादुर्भाव कायम असला तरी यंदाच्या हंगामात द्राक्षांची युरोपीय बाजारपेठेसह रशिया, आखाती देशात निर्यात सुरळीत आहे. गेल्या वर्षी द्राक्षाचा एक कंटेनर युरोपात पाठविण्यासाठी दोन हजार ते २२०० डॉलर इतके भाडे लागायचे. या वर्षी माल वाहतुकीचे दर दुपटीने वाढले असून सध्या त्यासाठी चार हजार ते ४२०० डॉलर मोजावे लागतात. वाहतूक खर्चात किलोमागे १० ते १२ रुपयांनी वाढ झाली. कृषी मालाच्या निर्यातीसाठी पाच टक्के प्रोत्साहन अनुदान देणाऱ्या योजनेला केंद्र सरकारकडून नव्या वर्षांत मुदतवाढ न मिळाल्याने त्याची झळ द्राक्ष निर्यातीला बसली आहे.

गेल्या वर्षी टाळेबंदीने द्राक्ष निर्यातीला मोठा फटका बसला होता. करोनाचे संकट अद्याप दूर झाले नसले तरी जगभरातील दैनंदिन व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. हंगामाच्या प्रारंभी पोषक वातावरणामुळे निर्यात वृद्धिंगत होण्याची आशा होती. परंतु, अकस्मात कोसळणारे नैसर्गिक संकट आणि अन्य कारणांनी अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. जानेवारी महिन्यात अवकाळी पावसाने नाशिक  जिल्ह्यातील सुमारे ३०० हेक्टरवरील द्राक्ष बागांचे नुकसान झाले होते. आता हंगाम ऐन भरात असताना हवामान विभागाने पुन्हा पावसाचा इशारा दिल्याने उत्पादकांमध्ये चिंतेचे सावट आहे. मध्यंतरीच्या पावसात निर्यातक्षम द्राक्षांचे नुकसान झाले होते. करोना काळात निर्यात जोखमीची ठरते. धोका पत्करण्यास निर्यातदार फारसे तयार नाहीत. त्यामुळे निर्यातीचे प्रमाण काहीसे कमी असल्याचे द्राक्ष निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ खापरे यांनी सांगितले.

नाशिकहून युरोपीय देशांसह रशिया, आखाती देशात द्राक्ष पाठवली जात आहेत. द्राक्षाच्या कंटेनरची जलमार्गाने वाहतूक होते. हा खर्च दुपटीने वाढला आहे. यामुळे अडचणीत भर पडल्याकडे सह्याद्री फार्म्सचे प्रमुख विलास शिंदे यांनी लक्ष वेधले. निर्यातीचा खर्च वाढल्याचे कृषी विभागाने मान्य केले. त्यामुळे काही उत्पादक देशांतर्गत बाजारात माल देण्याच्या विचारात आहेत. त्यास जिल्हा कृषी अधिकारी संजीव पडवळ यांनी दुजोरा दिला.

* प्रति किलो द्राक्षाच्या वाहतूक खर्चात झालेली वाढ निर्यातीस मारक ठरण्याची चिन्हे आहेत. कारण वाहतूकखर्चाचा भार सरतेशेवटी उत्पादकांवर टाकला जातो. म्हणजे त्यांच्या द्राक्षांची कमी दरात खरेदी केली जाते.

* सध्या निर्यातक्षम सोनाका, थॉमसनला किलोला ५० ते ७० आणि आरआर, गणेश, पर्पल या रंगीत द्राक्षांना ७० ते ९० रुपये दर मिळत आहे.

* युरोपीय बाजारात चिली आणि दक्षिण अफ्रिकेची द्राक्षे येतात. त्यांना शून्य आयात शुल्क आहे. भारतीय द्राक्षांना तिथे आठ टक्के शुल्क लागते.

* अशा वेळी केंद्राच्या निर्यात प्रोत्साहन अनुदानामुळे त्या द्राक्षांशी स्पर्धा करणे शक्य होते. या योजनेला ३१ डिसेंबर २०२० नंतर मुदतवाढ मिळाली नाही. यामुळे युरोपीय बाजारात स्पर्धा करणे अवघड बनल्याचे निर्यातदारांचे म्हणणे आहे.

३५ हजार मेट्रिक टन निर्यात

द्राक्ष हंगाम सध्या मध्यावर आहे. १५ एप्रिलपर्यंत द्राक्ष निर्यात सुरू राहील. गेल्या वर्षी टाळेबंदीमुळे अखेरच्या टप्प्यात निर्यात अडचणीत आली होती. त्या हंगामात एक लाख ९२ हजार मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली होती. या वेळी किती निर्यात होईल, याबद्दल अनिश्चितता आहे. युरोपीय देशातील हॉटेल अद्याप पूर्ण क्षमतेने उघडलेली नाहीत. भ्रमंतीवर काही निर्बंध आहेत. यामुळे नेहमीच्या तुलनेत मागणी बरीच कमी असल्याचे निर्यातदार संघटनेचे उपाध्यक्ष प्रीतम चौधरी यांनी सांगितले. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ३५ हजार १८७ मेट्रिक द्राक्षांची निर्यात झाली आहे. यात युरोपीय देशात २१ हजार ८७१ मेट्रिक टन तर युरोप वगळता अन्य देशात १३ हजार ३१६ मेट्रिक टनचा समावेश आहे. गेल्या वर्षी १६ फेब्रुवारीपर्यंत जवळपास इतकीच निर्यात झाली होती. त्यामध्ये युरोपीय बाजारपेठेत गेलेल्या २५ हजार मेट्रिक टन द्राक्षांचा समावेश होता. त्याआधीच्या हंगामात युरोपीय देशात ३३ हजार मेट्रिक टन द्राक्ष पाठविली गेली होती.