मनमाडजवळील लोहशिंगवे गावातील हेंबाडे कुटुंबीयांकडून गावपंगतही

नांदगाव : प्राणी कुठलाही असो, ते माणसाळले की कुटुंबाचा एक भाग बनतात. त्या प्राण्यांचा लळा लागला की तेदेखील आपल्याला जीव लावतात. त्यामुळे जणू काही घरातीलच सदस्य झालेला असा एखादा प्राणी अचानक जगातून गेल्यावर सर्वच हळवे होतात. असाच काहीसा प्रकार मनमाडजवळील लोहशिंगवे गावात घडला. अवघ्या तीन महिने वयाच्या एका घोडय़ाला हेंबाडे कुटुंबीयांनी जवळ केले. अगदी पोटच्या लेकराप्रमाणे त्याला काही वर्षे सांभाळले. दसऱ्याच्या दिवशी त्याचा मृत्यू झाल्याने अतिशय जिव्हाळ्याचं नाते जपलेल्या हेंबाडे कुटुंबीयांनी कुटुंबातील सदस्यच गेल्याचे दु:ख बाळगत बाबुराव असे नाव ठेवलेल्या घोडय़ाचा दशक्रिया विधी केला.

हा विधी परिसरात चर्चेचा विषयझाला आहे.

पाळीव प्राण्याविषयी आदरभाव ठेवणे, त्यांचा सांभाळ करणे ही अनेकांची भावना असते. त्यातच शेतकरी असतील तर त्यांच्याकडे पाळीव प्राणी हमखास असतातच. लोहशिंगवे या गावातील हेंबाडे कुटुंबीयदेखील त्यापैकी एक. अवघ्या तीन महिन्यांचे एक शिंगरू हेंबाडे कुटुंबीयांनी जवळ के ले. ‘बाबुराव’ असे त्याचे नाव ठेवल्यानंतर संपूर्ण कुटुंबीय त्याच्या प्रेमातच पडले होते. दररोज पहाटे उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्याला घरचा सदस्य म्हणून आपल्या दैनंदिन जीवनात सहभागी करून घेत असत. बाबुराव असा आवाज दिला की बाबुराव कुठेही असला तरी दौडतच घरासमोर यायचा. विशेष म्हणजे हेंबाडे कुटुंबीयांची ओळखच या ‘बाबुराव’मुळे परिसरात झाली. एके दिवशी जंगलात चरण्यासाठी गेलेला  बाबुराव आजारी पडला. त्यावर औषधोपचार करण्यात आले. परंतु, काहीही उपयोग झाला नाही. एरवी कुटुंबीयांशी मस्ती करणारा बाबुराव केवळ पाणावलेल्या डोळ्यांनी कुटुंबीयांकडे पाहत असे. या आजारातच त्याने दसऱ्याच्या दिवशी प्राण सोडला. त्याच्या अवेळी जाण्याने संपूर्ण हेंबाडे कुटुंबीय हेलावले. त्या दिवशी कुटुंबातील कोणीही जेवले नाही. अगदी घरातील एका सदस्याचा मृत्यू झाल्यासारखा सर्वानी हंबरडा फोडला. त्याचा अंत्यविधी घराशेजारील जागेत करण्यात आला. कुटुंबातील रामदास हेंबाडे यांनी पिंडदान करत त्याचा दशक्रिया विधी विधिवत के ला. दशक्रिया विधीच्या निमित्ताने हेंबाडे कुटुंबीयांनी बाबुरावच्या समाधीची विधिवत पूजा केली. मुंडनही केले. दशक्रिया विधीचे पूर्ण सोपस्कार पार पाडताना गाव पंगतसुद्धा दिली.

बाबुरावच्या आठवणी विसरणे कठीण असल्याचे या दशक्रिया विधीनंतर हेंबाडे कुटुंबीयांनी सांगितले. पाळीव प्राण्यांप्रति असलेले एवढे प्रेम स्थानिकांनी प्रथमच अनुभवले.