23 March 2019

News Flash

नदीजोड प्रकल्पांसाठी ४१ कोटी

दमणगंगा-एकदरे, अपर वैतरणा-कडवा-देव प्रकल्प

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

दमणगंगा-एकदरे, अपर वैतरणा-कडवा-देव प्रकल्प

दमणगंगा-एकदरे आणि अपर वैतरणा-कडवा देव या नदी जोड प्रकल्पांच्या सर्वेक्षण आणि अन्वेषणचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या अंदाजपत्रकास राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली. या कामासाठी जलसंपदा विभागाने ४१ कोटी रुपये मंजूर केले आहेत. दोन्ही प्रकल्प पूर्ण झाल्यास १२ टीएमसी अतिरिक्त पाणी जिल्ह्य़ास उपलब्ध होईल. यामुळे नाशिककरांचा पाणी प्रश्न कायमचा सुटणार आहे. तसेच सिन्नर तालुक्यातील सिंचन, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास हातभार लागणार आहे.

दोन्ही नदीजोड प्रकल्प प्रत्यक्षात साकारावेत, याकरिता दोन वर्षांपासून जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांच्या सहकार्याने खासदार हेमंत गोडसे पाठपुरावा करीत होते. त्यास यानिमित्ताने यश मिळाले. दमणगंगा-एकदरे या नदीजोड प्रकल्पाद्वारे पश्चिमी वाहिनी नद्यांचे अतिरिक्त पाणी पूर्वेकडे गोदावरी खोऱ्यात वळविण्यात येणार आहे. राष्ट्रीय जलविकास अभिकरणने तयार केलेल्या पूर्व व्यवहार्यतेनुसार या योजनेचा लाभव्यय गुणोत्तर १.४४ टक्के इतका आहे. या योजनेतून १०० दशलक्ष घनमीटर पाणी सिंचनासाठी, तर १४३ दशलक्ष घनमीटर पाणी उपसा पद्धतीने गोदावरी खोऱ्यात वळविण्यात येईल. जलसंपदा विभागाने या नदी जोड प्रकल्पाच्या सर्वेक्षण, अन्वेषणचा सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी १७ कोटी ७४ लाख १८ हजार रुपये मंजूर केले आहेत.

अपर वैतरणा- कडवा देव या नदीजोड प्रकल्पामुळे पश्चिमी वाहिनी नद्यांचे अतिरिक्त पाणी पूर्वेकडील गोदावरी खोऱ्यात वळविण्याचे प्रस्तावित आहे. या योजनेचे दोन पर्याय दिले गेले असून त्याचे लाभव्यय गुणोत्तर एकसाठी १.६५ आणि पर्याय दोनसाठी १.६४ येते. या योजनेतून २८.३२० हेक्टर क्षेत्रात सिंचनाचा लाभ मिळू शकतो. तसेच १३७.०१ दशलक्ष घनमीटर पाणी बिगर सिंचनासाठी उपलब्ध होऊ शकते.

या योजनेंतर्गत पाच धरणे बांधण्याचे प्रस्तावित आहे. ही धरणे परस्परांशी जोडण्यात येणार असून २०२ दशलक्ष घनमीटर पाणी उपसा पद्धतीने उचलून गोदावरी खोऱ्यातील देव नदीत वळविण्याचे प्रस्तावित आहे. या प्रकल्पाचा सविस्तर सर्वेक्षण, अन्वेषण अहवाल तयार २३ कोटी १४ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता मिळाली आहे.

अनेक प्रश्न  सुटणार

या दोन्ही नदीजोड प्रकल्पामुळे गोदावरी खोऱ्यात १२ टीएमसी पाणी उपलब्ध होईल. याद्वारे नाशिकसह सिन्नर तालुक्यातील पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरीडॉरसाठी लागणाऱ्या पाण्याची पूर्तता करता येईल. या प्रकल्पांमुळे शिर्डी, जायकवाडीला पाणी मिळणार असल्याचा विश्वास खा. गोडसे यांनी व्यक्त केला.

First Published on June 6, 2018 12:46 am

Web Title: river connecting projects in nashik