रस्त्यालगत थांबलेल्या वाळूच्या मालमोटारीवर भरधाव टेम्पो ट्रॅव्हलर धडकून झालेल्या भीषण अपघातात १० ठार, तर १४ जण जखमी झाले. मुंबई-आग्रा महामार्गावरील सोग्रस गावाजवळ गुरुवारी सकाळी हा अपघात झाला. मृतांमध्ये सात वर्षीय मुलासह सात महिलांचा समावेश आहे. जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातातील मृत, जखमी हे कल्याण, उल्हासनगर, कांदिवली आणि नाशिकचे रहिवासी आहेत.

कल्याणहून मध्य प्रदेशातील उज्जन येथे देवदर्शनासाठी २४ भाविक साई ट्रॅव्हल्सच्या टेम्पो ट्रॅव्हलरने गेले होते. देवदर्शनानंतर परतत असताना सकाळी सहा वाजता अपघात घडला. महामार्गावरील सोग्रस गावाजवळ वाळू वाहतूक करणारी मालमोटार पंक्चर झाली होती. चालकाने मालमोटार रस्त्याच्या बाजूला नेऊन टायर बदलण्याची तयारी सुरू केली असता त्याचवेळी मागून भरधाव आलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरने मालमोटारीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, त्यात टेम्पो ट्रॅव्हलरच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. अपघातात जागृती धावटी (३५), गुंजन बालादोरा (२५), गीता नरशी परमार (४५), पवन आवटी (सात), लक्ष्मीबाई परमार (६५), किसन चव्हाण (५८), प्रकाश धावटी (३७), काऊ चव्हाण (४८), गीता मोहन परमार (४०), निशा धावटी (१६) यांचा मृत्यू झाला, तर १४ जण जखमी झाले.  टेम्पो ट्रॅव्हलर चालकास डुलकी लागल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.