विनाहेल्मेट ११२ दुचाकीस्वारांचा मृत्यू

विना हेल्मेट, सीटबेल्ट न लावता वाहन चालविणे आणि निष्काळजीपणे रस्ता ओलांडणे अनेकांच्या जिवावर बेतत आहे. या वर्षांत ११५ दुचाकीस्वारांचा अपघाती मृत्यू झाला. त्यापैकी ११२ चालक विनाहेल्मेट होते. १२ अपघातात एकाही चालकाने सीटबेल्ट लावलेला नव्हता. नियमांचे पालन होत नसल्याने अपघातातील मृतांचे प्रमाण वाढत आहे. या पाश्र्वभूमीवर, आई-वडिलांनी मुलाला, पत्नीने पतीला हेल्मेट, सीटबेल्ट वापरण्यास बंधनकारक करावे. मुलांनी आई-वडिलांना तुम्ही आमचा आधार आहात तर तुम्ही हेल्मेट, सीटबेल्ट वापरा यासाठी हट्ट धरावा. शहर पोलिसांच्या जनजागृती मोहिमेत कुटुंबीयांनी सहभागी होऊन नियम पालनासाठी आग्रही राहावे, असे   आवाहन करण्यात आले आहे.

शनिवारी रात्री मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर ग्रामीण पोलीस मुख्यालयातील सागर शेजवळ (२४) आणि संदीप गवारे (३०) या दुचाकीस्वारांचा अपघाती मृत्यू झाला. उभयतांनी हेल्मेट परिधान केलेले नव्हते. अमृतधाम चौफुलीपुढे उभ्या असलेल्या मालमोटारीला त्यांची दुचाकी जाऊन धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, एका दुचाकीस्वाराचे शिर धडावेगळे झाले. दुसऱ्याच्या डोक्याला गंभीर मार लागून त्याचा मृत्यू झाला. २०१८ वर्षांत आतापर्यंत एकूण ११५ दुचाकीस्वारांचा अपघाती मृत्यू झाला. त्यापैकी ११२ चालक विना हेल्मेट होते. मालमोटारीच्या १२ अपघातांमध्ये एकाही चालकाने सीटबेल्ट लावलेला नव्हता, याकडे वाहतूक पोलीस विभागाने लक्ष वेधले आहे. शहर पोलीस हेल्मेट, सीटबेल्टचा वापर आणि वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत सातत्याने जनजागृती करीत आहेत. कायदेशीर कारवाईद्वारे वाहनधारकांनी नियम पालन करावे, असा प्रयत्न केला जातो. शनिवारच्या घटनेत चालकांकडे महागडी स्पोर्टस मोटारसायकल होती. पण हेल्मेट नव्हते.

तरुण वाहनधारक अधिक

अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये सुमारे ७० टक्क्य़ाहून अधिक तरुण म्हणजे १८ ते ४० या वयोगटातील चालक आहेत. त्यामुळे तो वाहनचालक मृत्यू पावल्यास आई-वडील, कुटुंबिय, नातेवाईक, मित्र मंडळी यांच्यावरही परिणाम होतो. तो कमावता असेल तर त्याचे संपूर्ण कुटुंब भरडले जाते. आर्थिक विवंचनेत सापडते. त्यामुळे वाहनधारकांनी वाहन चालविताना या सर्व गोष्टींचा विचार करून हेल्मेट, सीटबेल्टचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

५२ पादचाऱ्यांचा मृत्यू

रस्त्यांवरून चालणारे पादचारीही निष्काळजीपणे, चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या ठिकाणी रस्ता ओलांडल्यामुळे आपला जीव गमावतात. रस्ता ओलांडतानाही काळजी घ्यायला हवी. या वर्षांत आतापर्यंत ५२ पादचाऱ्यांनी रस्ते अपघातात जीव गमावला आहे.