पोलीस आयुक्तांकडून वाहतूक नियम पाळण्याचे आवाहन

बहुतांश अपघात मानवनिर्मित असतात. नाशिकमध्ये अपघाताचे प्रमाण वाढण्यामागेही वाहतुकीचे नियम न पाळणे हे एक कारण आहे. वाहनचालकांनी अपघात घडणार नाही याची दक्षता घेऊन ‘डॉन’ म्हणजेच ‘दोस्त ऑफ नाशिक’ होणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी केले.

[jwplayer 4Ldgg0db]

नाशिक फर्स्ट आणि सातपूर औद्योगिक वसाहतीतील ग्लेनमार्क फार्मास्युटिकल यांच्या वतीने शहरात वाहनचालकांमध्ये वाहतुकीचे नियम पाळून डॉन म्हणजेच दोस्त ऑफ नाशिक होण्याची संकल्पना राबविण्यासाठी आयोजित कार्यक्रमात सिंघल यांनी कामगारांना रस्त्यावर वाहतुकीचे नियम व शिस्तीचे पालन याबद्दल मार्गदर्शन केले. डॉन उपक्रमाची सुरुवात चांगली झाल्याने नागरिकांनी प्रतिसाद दिल्यास शहर वाहतुकीसाठी निश्चितच वेगळा परिणाम दिसेल अशी अपेक्षा आयुक्तांनी व्यक्त केली. पोलीस निरीक्षक शंकरराव काळे यांनी मागील वर्षी नाशकात सुमारे १२६ जणांना अपघातात जीव गमवावा लागला, तर अनेक जणांना जायबंदी व्हावे लागल्याची माहिती दिली. हे सर्व अपघात मानवी चुकांमुळे घडले आहेत. अपघातातून निर्माण होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी पालकांनी पाल्याला वाहनाची चावी देताना तो स्टंटबाजी करणार नाही याची काळजी घ्यावी. चारचाकी वाहन चालविताना सीट बेल्ट, हेल्मेटचा वापर करा. वाहनांची गती कमी ठेवा. अशा पद्धतीने वाहन चालविल्यास प्रत्येक चालक हा डॉन म्हणजे दोस्त ऑफ नाशिक होईल, अशी आशाहीकाळे यांनी व्यक्त केली.

ग्लेनमार्कचे दीपक औटी यांनी कंपनीची चित्रफीतद्वारे माहिती सादर करून कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कामावर येताना हेल्मेट आवश्यक असून त्याशिवाय कंत्राटी व कायम कामगारांना प्रवेश दिला जात नसल्याची माहिती दिली. याशिवाय कामगाराचा चालक परवाना नित्य तपासला जातो, असेही त्यांनी नमूद केले. या वेळी वाहतुकीचे काटेकोरपणे नियम पाळणाऱ्या कंपनीतील १० कामगारांना पोलीस आयुक्तांच्या हस्ते डॉनचे स्टिकर वाटप करण्यात आले. व्यासपीठावर पोलीस उपायुक्त विजय पाटील, साहाय्यक आयुक्त जयंत बजबळे, नाशिक फर्स्टचे अध्यक्ष अभय कुलकर्णी, ग्लेनमार्कचे संजय चपळगावकर, किरण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

[jwplayer UyWFIua2]