नाशिक- पुणे महामार्गाच्या रुंदीकरणामध्ये अडथळा ठरणा-या शिंदे गावातील २३ घरांवर सोमवारी हातोडा मारण्यात आला. कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये ही कारवाई करण्यात आली असून अतिक्रमणावरील कारवाईदरम्यान अतिक्रमणधारकांनी विरोध दर्शवल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.

गेल्या दोन वर्षापासून शिंदे गावातील नागरिकांच्या विरोधामुळे नाशिक-पुणे महामार्गाचे रुंदीकरण रखडले आहे. या रुंदीकरणासाठी स्थानिक नागरिकांना विस्थापित करण्यापेक्षा शेजारील जागेचा वापर करण्यात यावा अशी मागणी करत स्थानिकांनी याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली होती. हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेले होते. मात्र  सुप्रीम कोर्टानेही स्थानिकांनी जागा रिकामी करून द्यावी असे आदेश दिले होते. काही दिवसांपूर्वी भूसंपादन विभागाने रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणा-या २३ लहान मोठ्या घरांच्या मालकांना नोटीस बजावली होती. मात्र या रहिवाश्यांनी काही दिवस मुदतवाढ मिळावी अशी मागणी केली. त्याप्रमाणे वेळ वाढवून देखील स्थानिकांनी अतिक्रमण काढले नव्हते.

सुप्रीम कोर्टाचा निकाल आणि दिलेला कालावधी संपुष्टात आल्याने सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता उपजिल्हाधिकारी दीपमाला चौरे, तहसिलदार अहिराव यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईस सुरूवात झाली. यावेळी काही रहिवाश्यांनी कारवाईला विरोध केला व आणखी आठ दिवसाचा कालावधी द्यावा अशी मागणी केली. यावेळी पथकातील अधिका-यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा हवाला देत मुदतवाढ देणे शक्य नाही असे सांगितल्यानंतर रहिवाश्यांचा विरोध मावळला. ही कारवाई सुरू असताना नाशिकरोड ते सिन्नर मार्गावर दोन्ही बाजूकडे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांसह, विद्यार्थी, नोकरदार यांची गैरसोय झाली. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त अतुल झेंडे, मोहन ठाकूर, नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्यासह १४ अधिकारी, १४० पोलीस कर्मचारी, शीघ्र कृती दल असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.