‘स्मार्ट’ मुळे शैक्षणिक भवितव्य अंधारात; संस्थांना चिंता

शहराला ‘स्मार्ट’ करण्यासाठी महापालिका आणि स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉपरेरेशन यांच्या वतीने  घेतलेले रस्ते कामामुळे येथील शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी गैरहजेरीचे प्रमाण वाढल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत शैक्षणिक संस्थांनी चिंता व्यक्त केली आहे. तीन महिन्यांपासून ‘त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ’ हा रस्ता स्मार्ट करण्यासाठी काम सध्या सुरू आहे. येथील परिसरात ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका रस्त्याच्या कामातंर्गत मुख्य रस्त्यावरील वाहनांची वर्दळ लक्षात घेता पहिल्या टप्पात केवळ मेहेर सिग्नल ते सीबीएसपर्यंत काम सुरू करण्यात आले आहे. या रस्त्यावर शासकीय कन्या विद्यालय, दि न्यू नाशिक एज्युकेशन सोसायटीची दोन  विद्यालये, कनिष्ठ महाविद्यालय आहेत. कन्या विद्यालय आणि दि न्यू नाशिक एज्युकेशन सोसायटी या दोन्ही संस्थांमध्ये साधारणत पाच हजाराहून अधिक विद्यार्थी आहेत. नव्या शैक्षणिक वर्षांच्या सुरुवातीलाच रस्त्याचे काम सुरू झाल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना शाळेत ये-जा करण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायाचा अवलंब करावा लागला. प्रशासनाशी चर्चा करत जिल्हा परिषदेच्या शिवाजी स्टेडियममधून रस्ता करण्यात आला. हा रस्ता शाळेसाठी ‘असून अडचण नसून खोळंबा’ असा झाला आहे. हा रस्ता शालेय विद्यार्थ्यांसाठी असताना इतर पादचाऱ्यांकडूनही त्याचा अवलंब केला जात आहे. शाळेजवळूनच पादचारी ये-जा करत असतांना मोठय़ाने बोलणे होत असल्याने विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेवर परिणाम होत आहे.

दुसरीकडे, जे विद्यार्थी खासगी वाहनांनी येतात, त्यांना महात्मा गांधी रस्ता किंवा शालिमार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सोडण्यात येते. वाहनांची वर्दळ पार करत चिखल तुडवत विद्यार्थ्यांना शाळेत यावे लागत आहे.

या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. त्यामुळे काही विद्यार्थी शाळेत येत नाही. दररोज एकूण पटसंख्येत १० ते २० टक्के विद्यार्थी शाळेत गैरहजर असतात. अकरावीचे जे नियमित प्रवेश व्यवस्थापनाकडून करण्यात येत होते, ते प्रवेशही यंदा रस्ता बंद असल्याने झाले नाहीत. बारावीचे विद्यार्थीही बोटावर मोजण्या इतपतच वर्गात उपस्थितीत असतात. त्यामुळे परीक्षा आणि वार्षिक निकालावर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

डी. डी. बिटको बॉईज स्कूल आणि वाय. डी. बिटको गर्ल्स हायस्कूलसह संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी झाली आहे. दहा ते २० टक्के विद्यार्थी गैरहजर असतात. अकरावी प्रवेश प्रक्रियेवरही याचा परिणाम झाला आहे. शाळा, महाविद्यालयांसमोरील मुख्य रस्ताही बंद आहे. शिक्षकांना वाहने शाळेत आणतांना अडचणी येत आहेत. शालिमार येथे वाहन उभे करण्यासाठी दिवसाला १० रुपये देऊन त्यांचे वाहन द्यावे लागतात. वाहनांच्या गर्दीतून बाहेर पडतांना तीन महिन्यात शिक्षकांचे विशेषत महिला शिक्षकांना अपघातांना सामोरे जावे लागले आहे. हुतात्मा स्मारकाजवळील रस्ता शाळेने खुला केल्याने शाळेची शांतता भंगली आहे.

– रेखा काळे,  मुख्याध्यापिका, डी. डी. बिटको बॉईज हायस्कूल