शहर परिसरात सोनसाखळीचे सत्र आणि बनावट पोलीस असल्याचे भासवत एक लाखहून अधिक किमतीचा सोन्याचा ऐवज लंपास करण्याच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरटय़ांकडून ज्येष्ठांना लक्ष्य केले जात असल्याचे निदर्शनास येत आहे.
गंगापूररोड परिसरातील रहिवासी उषा किसन काळुंगे (५६) या पतीसमवेत सकाळी साडे सहाच्या सुमारास पारिजातनगर येथील जॉगिंग ट्रॅक परिसरात आल्या होत्या. पायी भ्रमंती करत असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन संशयितांनी धक्का देत त्यांच्या गळ्यातील ८० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावत पलायन केले. दुसरी घटना गंगापूर रस्त्यावरील आकाशवाणी केंद्र परिसरात घडली. या ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या जया रामचंद (६७) या काही कामानिमित्त घराबाहेर पडल्या होत्या. आकाशवाणी केंद्रासमोर रस्ता ओलांडत असताना दोन संशयित त्यांच्याजवळ येऊन थांबले. शहर परिसरात सोनसाखळी चोरीचे सत्र सुरू असतांना अंगावर इतके दागिने घालून बाहेर कशाला फिरता, अशी विचारणा त्यांनी केली. बोलण्यात गुंतवून आम्ही साध्या वेशातील पोलीस असून तुम्ही सुरक्षिततेच्या दृष्टीने अंगावरील दागिने काढून पिशवीत ठेवा, अशी सूचना केली. पोलीस असल्याचे समजत जया रामचंद यांनी अंगावरील सोनसाखळी व अंगठी असा ४५ हजार रुपयांचा ऐवज पिशवीत ठेवला. यावेळी चोरटय़ांनी पिशवी लंपास केली. या दोन्ही घटनांप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील वेगवेगळ्या भागात सातत्याने घडणाऱ्या सोनसाखळी चोरीच्या घटना आणि बनावट पोलीस असल्याचे सांगून होणारी लुबाडणूक थांबविण्यात पोलीस यंत्रणेला यश आलेले नाही. अशा घटनांमध्ये आजवर लाखो रुपयांचे दागिने चोरटय़ांनी लंपास केले. अव्याहतपणे हे प्रकार सुरू आहेत. त्यावर नियंत्रण आणण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरल्याची सर्वसामान्यांची भावना आहे.