शहरात बंद घरे चोरटय़ांकडून लक्ष्य करण्याचा सपाटा सुरू असताना शुक्रवारी रात्री सिंहस्थ पर्वात रामकुंडावरील प्राचीन गंगा गोदावरी मंदिर तसेच शेजारील बाणेश्वर मंदिरात चोरटय़ांनी धाडसी चोरी केल्यामुळे खळबळ उडाली आहे. दोन्ही मंदिरांतील दानपेटीतील रोकड चोरटय़ांनी लंपास केली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिशय गजबजलेल्या रामकुंडावर पुरोहित संघाचे गंगा गोदावरी मंदिर आहे. दर बारा वर्षांनी उघडणारे हे मंदिर सिंहस्थ काळात भाविकांच्या दर्शनासाठी खुले होते. मध्यरात्रीच्या सुमारास चोरटय़ांनी मंदिराचा दरवाजा व कुलूप तोडून आत प्रवेश केला. देवीच्या अंगावरील मौल्यवान आभूषणे, सोन्याचे दागिने पुरोहित संघाने आधीच काढून घेतले असल्याने मोठय़ा ऐवज चोरटय़ांना लंपास करता आला नाही. दानपेटी फोडून चोरटय़ांनी रोकड लंपास केली. या मंदिराच्या शेजारी बाणेश्वर महादेव मंदिराकडे चोरटय़ांनी मोर्चा वळविला. तेथील दानपेटीतील रक्कमही लंपास करण्यात आली. सिंहस्थ काळात रामकुंड परिसरात अनेक भाविकांचे मौल्यवान दागिने चोरटय़ांनी लंपास केले होते. सिंहस्थातील मुख्य पर्वण्या झाल्यानंतर चोरटय़ांनी थेट मंदिरात चोऱ्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे.