21 November 2019

News Flash

नाशिकमध्ये दरोडय़ाचा प्रयत्न

भरदिवसा मुथूट फायनान्समध्ये चौकडी घुसली

उंटवाडी रस्त्यावरील मुथूट फायनान्सच्या कार्यालयात दरोडय़ाचा प्रयत्न झाला. घटनेवेळी सीसीटीव्ही यंत्रणेत टिपल्या गेलेल्या संशयितांच्या हालचाली.

भरदिवसा मुथूट फायनान्समध्ये चौकडी घुसली, १कर्मचारी ठार, २ जखम

काही दिवसांपासून शहरात वाढत चाललेल्या गुन्हेगारीने शुक्रवारी कळस गाठला. नाशिकच्या सिडकोतील उंटवाडी रस्त्यावरील मुथूट वित्तीय संस्थेच्या कार्यालयात एका टोळक्याने सकाळी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. या वेळी धोक्याचा इशारा देणारा भोंगा वाजवणाऱ्या कर्मचाऱ्याची या टोळक्याने हत्या केली तर गोळीबारात दोन कर्मचारी जखमीही झाले.

मुरूयायीकारा संजू सॅम्युअल (वय २९) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे, तर गोळीबारात व्यवस्थापक चंद्रशेखर देशपांडे आणि कर्मचारी कैलास जैन हे जखमी झाले. भरवस्तीत दिवसाढवळ्या गोळीबार, दरोडय़ाचा प्रयत्न या घटनांची भर पडल्याने नाशिककरांमध्ये कमालीची भीती आणि पोलिसांच्या निष्क्रियतेविषयी संताप व्यक्त होत आहे.

उंटवाडी पुलाशेजारी मधुरा टॉवर इमारतीत पहिल्या मजल्यावर ‘मुथूट फायनान्स’चे कार्यालय आहे. तळमजल्यावर दोन बँकांच्या शाखा आहेत. टोळक्याने दरोडय़ासाठी मागून जिना असणाऱ्या वरच्या मजल्यावरील मुथूटकडे मोर्चा वळविला. कार्यालयात सकाळी नेहमीप्रमाणे कामकाज सुरू झाले होते. या वेळी पाच कर्मचारी आणि आठ ग्राहक असे एकूण १३ जण उपस्थित होते. पावणेअकराच्या सुमारास चेहरा झाकलेले दोघे आणि चेहरा न झाकलेले दोघे असे एकूण चारजण कार्यालयात शिरले. कोणाला काही कळण्याच्या आत त्यांनी पिस्तूल रोखत सर्वाकडील भ्रमणध्वनी काढून घेतले. सर्वाना एका कोपऱ्यात उभे केले.

टोळके दरोडा घालण्याच्या प्रयत्नात असल्याचे लक्षात आल्यावर कर्मचारी धास्तावले. या वेळी मुरूयायीकारा याने प्रसंगावधान राखत धोक्याचा इशारा देणाऱ्या यंत्रणेची कळ दाबली. अकस्मात भोंगे वाजल्याने दरोडेखोर हादरले. लुटीचा बेत फसल्याने त्यांनी संतापात सॅम्युअलवर अगदी जवळून गोळ्या झाडल्या. अंदाधुंद गोळीबार करीत ते बाहेर पडले आणि दुचाकीवर पसार झाल्याचे सांगितले जाते. गोळीबारात दोघे जण जखमी झाले.

अवघ्या पाच ते १० मिनिटांत घडलेल्या या घटनाक्रमामुळे एकच गोंधळ उडाला. महिला कर्मचारी, ग्राहक पुरते हबकले. या घटनेची माहिती समजल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु, तत्पूर्वीच सॅम्युअलचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. आमदार सीमा हिरे यांनीही भेट देऊन माहिती घेतली. या घटनेमुळे व्यापारी, व्यावसायिकांमध्ये घबराट पसरली असून यंत्रणेविरुद्ध रोष वाढत आहे.

नाकाबंदी..

  • मुथूटच्या कार्यालयात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित आहे. संकुलातील अन्य सीसीटीव्हीच्या चित्रणात संशयितांच्या हालचाली टिपल्या गेल्या आहेत.
  • त्यावरून संशयित पल्सरसारख्या दुचाकीवरून आल्याचे दिसून येते. संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार संशयित मराठी भाषिक होते.
  • या घटनेनंतर सर्वत्र तातडीने नाकाबंदी करत पोलिसांनी संशयितांची शोध मोहीम सुरू केली.

धोक्याचा इशारा देणारी यंत्रणा कार्यान्वित झाल्याने दरोडय़ाचा उद्देश असफल ठरला. गुन्हेगारांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली आहे. परिसरातील नोंदीवरील गुन्हेगारांची छाननी केली जात आहे.  – विश्वास नांगरे पाटील, पोलीस आयुक्त

First Published on June 15, 2019 12:49 am

Web Title: robbery crime
Just Now!
X