News Flash

भरदिवसा घरफोडी करणाऱ्या पाच जणांना अटक

घरातील कपाटात ठेवलेले ५१ लाख १५ हजार रुपयांचे दागिने आणि इतर साहित्य चोरण्यात आले होते.

नाशिक : शहरातील गंगापूर रोड येथील आनंद व्हिला बंगल्यात भरदिवसा घरफोडी करून ५१ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरणाऱ्या पाच चोरटय़ांना शहर पोलीस गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त करण्यात आला.

रोमेश लुथ्रा यांच्या घरातील कपाटात ठेवलेले ५१ लाख १५ हजार रुपयांचे दागिने आणि इतर साहित्य चोरण्यात आले होते. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लुथ्रा यांच्या घरातील चोरीचा तपास करतांना घरातील महिला कर्मचारी राधाबाई गायकवाड हिच्यावर पोलिसांनी लक्ष्य केंद्रित केले. तिची सखोल चौकशी केली असता तिने गुन्ह्य़ाची कबुली दिली. लुथ्रा यांना घरातील कपाटात दागदागिने, पैसे ठेवतांना पाहिले होते. ही माहिती तिने संशयित बालाजी घागरमळे (रा. इंदिरानगर), दत्ता भदर्गे (रा. राणेनगर) यांना दिली. त्यांनी एकत्रितरित्या दागिने चोरी करण्याचा कट रचला. २७ जानेवारी रोजी लुथ्रा घरात नसल्याचे महिलेने अन्य संशयितांना सांगितले. तिघांनी घरफोडी करत हे दागिने संशयित योगेश पाईकराव (रा. समतानगर), अभिषेक निकम (रा. भांडीबाजार) यांच्या मदतीने शहरातील सराफ व्यावसायिकास विक्री करून आलेले रोख रुपये आपआपसात वाटून घेतल्याची कबुली दिली.

पोलिसांनी गायकवाड, घागरमळे, भदर्गे, पाईकराव, निकम यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे चौकशी केली असता घागरमळे याने घरफोडी केल्यानंतर त्यातील सोन्याचे दागिने, हिरे, बांगडय़ा काढून पासपोर्ट आणि अन्य कागदपत्रे इतरत्र फेकून दिल्याचे सांगितले. सोन्याचे दागिने, हिरे विकून २५ लाख ७५ हजार रुपये आले. ती रक्कम आपआपसात वाटून घेतली. पोलिंसांनी ही रक्कम हस्तगत केली असून संशयितांना मुद्देमालास सरकारवाडा पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आले.

वस्त्रांतर गृहात चोरी करणाऱ्यांना अटक

रामकुंडावरील वस्त्रांतर गृहात पूजा-अर्चा करणाऱ्या ब्रह्मवृंदाची पेटी आहे. संशयितांनी पेटी फोडत ९६ हजार रूपयांचे चांदीचे पूजेचे सामान लंपास केले. पंचवटी पोलीस गुन्हे शोध पथक याचा तपास करत असतांना संशयित समाधान वाघ (२२, रा. पंचवटी), नाना शेवरे (२५, रा. फुलेनगर) आणि विधीसंघर्षित बालकाने ही चोरी केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्य़ाची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून चांदीच्या १२ गायी, चांदीचे लहान मोठे ३५ नाग, चांदी तांबे मिश्रीत २८ देव मूर्ती, चांदीच्या तीन होडय़ा, चांदीच्या पत्र्याचे २५ लहान देव, तांब्याचे ५० ताट, तीन स्टीलचे ताट, एक पितळी तांब्या आदी माल हस्तगत केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2020 12:33 am

Web Title: robbery crime news five arrest akp 94
Next Stories
1 विचित्र अपघातातील मृतांची संख्या २६ वर
2 अपघाती क्षेत्रांचा नव्याने शोध
3 भरधाव बस  विरुध्द मार्गिकेत शिरल्याने अपघात