सिन्नरच्या वावी येथे गुरुवारी मध्यरात्री पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या बंगल्यात शिरलेल्या दरोडेखोरांनी पिस्तूल आणि तीक्ष्ण हत्यारांचा धाक दाखवत पावणेदोन लाख रुपयांची रोकड, सोन्याचे दागिने लंपास केल्यामुळे खळबळ उडाली आहे. मारहाण करत महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने त्यांनी ओरबाडून घेतले. घरातील सदस्यांना साडीने बांधून दरोडेखोरांनी पलायन केले. संशयितांचे रेखाचित्र तयार करत इतर माध्यमांतून दरोडेखोरांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.

या प्रकरणी पशुवैद्यकीय अधिकारी रमेश देव्हाड यांनी तक्रार दिली. वावी येथील गायत्रीनगर भागात देव्हाड यांचा बंगला आहे. देव्हाड यांच्यासह पत्नी निर्मला, मुलगी वैष्णवी आणि मुलगा ओमकार असे चार जणांचे एकत्रित कुटुंब या ठिकाणी वास्तव्यास आहे. गुरुवारी रात्री पावणेअकरा वाजता जेवण झाल्यावर सर्व सदस्य झोपी गेले. रात्री अडीचच्या सुमारास पाच दरोडेखोरांनी स्वयंपाक घराचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. यावेळी झालेल्या आवाजाने निर्मला देव्हाड यांना जाग आली. त्या मुलांना पाहण्यासाठी दुसऱ्या खोलीत गेल्या असताना घरात दरोडेखोर शिरल्याचे लक्षात आले. त्यांनी आरडाओरड केल्यावर घरातील इतर सदस्य जागे झाले. दरम्यानच्या काळात दरोडेखोर झोपण्याच्या खोलीत शिरले. त्यांनी रमेश देव्हाड यांच्या कानाजवळ पिस्तूल लावले, तर निर्मला यांच्या गळ्याजवळ चाकू ठेवून शांत बसण्यास सांगितले.

काहींनी घरातील साहित्याची उलथापालथ करत कपाटाची चावी मागितली. चावी देण्यास नकार दिल्यावर दरोडेखोरांनी तुम्ही डॉक्टर असल्याचे ज्ञात असल्याचे सांगत कपाटाचे कुलूप कटावणी, हातोडीने तोडले. या घटनाक्रमामुळे भयभीत झालेल्या निर्मला यांनी शेजारी वास्तव्यास असणाऱ्यांना आवाज देण्याचा प्रयत्न केला. हे पाहून एकाने त्यांना मारहाणही केली.

कपाटाचे कुलूप तोडून दरोडेखोरांनी एक लाख १५ हजारांची रोकड, निर्मला यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, कानातील झुबे तोडून घेतले. हातातील अंगठी, त्यांच्या पर्समधील तीन हजारांची रोकड, दोन भ्रमणध्वनी काढून घेतले. घरातून पलायन करण्याआधी दरोडेखोरांनी पती-पत्नीसह सर्वाना साडीने बांधले. सकाळी सहा वाजेपर्यंत आम्ही घराबाहेर थांबणार असल्याचे सांगत कोणी आरडाओरड करू नये, असा इशारा देऊन ते घराबाहेर पडले.

अकस्मात घडलेल्या या घटनाक्रमातून काही वेळाने कुटुंबीय सावरले. दरोडेखोर गेल्याची खात्री पटल्यानंतर देव्हाड यांनी आसपासच्या नागरिकांना मदतीसाठी बोलाविले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी पोलीस अधीक्षक संजय दराडे, पोलीस उपअधीक्षक आदींनी घटनास्थळाची पाहणी करत तपासाबाबत सूचना केली. निर्मला देव्हाड यांनी सांगितलेल्या वर्णनावरून संशयिताचे रेखाचित्रही तयार करण्यात आले आहे. श्वान पथक आणि ठसेतज्ज्ञांच्या पथकाला पाचारण करण्यात आले. दरोडेखोरांनी लंपास केलेल्या भ्रमणध्वनीचे लोकेशन यंत्रणेकडून तपासले जात होते. संशयितांच्या शोधार्थ वेगवेगळ्या पातळीवर तपास यंत्रणेकडून प्रयत्न सुरू झाले.