फोनवरुन एटीएम कार्डचा नंबर घेवून बँक खात्यातील पैसे परस्पर काढून लुटण्याचा प्रकार शिरपुर शहरात घडला आहे. संतोष रघुनाथ बारी या शेतकर्‍याच्या बाबतीत हा प्रकार घडला असुन त्यांना जवळपास २५ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत त्यांनी शिरपूर पोलिसात फिर्याद दिली आहे. मी ‘या’ बँकेतील कर्मचारी बोलत असून तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक होईल, कृपया बँक खात्यासंबंधीत माहिती द्या असे सांगून फसवणुक करण्याच्या घटना यापुर्वीही धुळे जिल्ह्यात घडल्या आहेत. शिरपूर येथील रहिवासी संतोष रघुनाथ बारी यांना देखील दि.२७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता अशाच प्रकारे फोन आला.

कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांना फोन करुन मी नाशिक हेड ऑफिस मधून बोलतो आहे असे म्हणत, त्यांच्या बँक ऑफ इंडियाच्या एटीएम कार्डचा १६ अंकी नंबर विचारुन घेतला. तो नंबर मिळवून नंतर त्यांच्या खात्यातील २४ हजार ९९९ रुपये काढून घेतले. बँक खात्यातून पैसे गेल्याचा संदेश मोबाईलवर मिळाल्यावर त्यांना फसवणुक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी त्यांनी तत्काळ शिरपूर पोलिस ठाण्यात याविरुध्द तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.