येवला तालुक्यातील जळगाव नेऊर गावात सोमवारी मध्यरात्री जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेवर दरोडा टाकून १७ लाखाहून अधिकची रोकड पुन्हा लंपास करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. मागील घटनांप्रमाणे गॅस कटरच्या सहाय्याने तिजोरी फोडण्यात आली. जिल्हा बँकेच्या ग्रामीण भागातील शाखांवर दरोडा पडण्याची वा रोकड लंपास करण्याची ही सातवी घटना आहे. या घटनांमधून आतापर्यंत एक कोटी आठ लाख २४ हजार रुपयांची दरोडेखोरांनी लूट केली आहे. विद्यमान कार्यकारिणीने त्यांच्या कार्यकाळात दरोडय़ांचे प्रमाण वाढले असतानाही ते रोखण्यासाठी तातडीने विशेष प्रयत्न न केल्यामुळे ही स्थिती ओढावल्याची ग्राहकांची भावना आहे. जळगाव नेऊर येथे शाखेवर दरोडा पडण्याआधी या शाखेत सीसी टीव्ही कॅमेरे आले होते. ते कार्यान्वित होण्यास काही अवधी होता. त्याच रात्री दरोडय़ाची घटना घडल्याने बँकेतील काही मुखंडाचा हात आहे काय, अशी दबक्या आवाजात सध्या चर्चा सुरू आहे.
औरंगाबाद-नाशिक महामार्गावरील जळगाव नेऊर गावात जिल्हा बँकेची शाखा आहे. शाखा कार्यालयाच्या मागील बाजुची लोखंडी खिडकी तोडुन दरोडेखोरांनी आतमध्ये सहज प्रवेश केला. शाखेतील तिजोरी गॅस कटरच्या सहाय्याने फोडली. तिजोरीतील १७ लाख २४ हजार ७६० रुपयांची रोकड लंपास करण्यात आली. शाखेत सुरक्षारक्षक नाही. सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांसह बँकेच्या अध्यक्षांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, सोमवारी सकाळी केंद्रीय शाखेतून १५ लाख रुपये अन्य बँकेत जमा करण्यात आले. शाखेतील बीएसएनएल सेवा खंडित राहिल्याने संगणक बंद पडले. या स्थितीत ४०-४५ ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून तीन लाख ३६,९०० रुपये येवला शाखेतून जमा असल्याची शहानिशा करून ग्राहकांना देण्यात आले. मात्र बँकेची वेळ संपल्यावर बँकेत १७ लाख २४, ७६० रुपये शिल्लक होते. तिजोरीतील याच रकमेवर दरोडेखोरांनी डल्ला मारला. महत्वाची बाब म्हणजे, सोमवारी शाखेत सी सी टीव्ही कॅमेरे शाखेत आणण्यात आले. ते बसविण्याआधीच दरोडय़ाची घटना घडल्याने वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या जात आहेत. जिल्हा बँकेच्या ग्रामीण भागातील शाखांवर याआधी या पध्दतीने दरोडे पडले आहेत. येवला तालुक्यात बँक कर्मचाऱ्यांना मारहाण करून ५० लाखाची रोकड लंपास करण्यात आली होती. एका शाखेतील ग्राहकांचे लॉकर्स फोडून कोटय़वधींचा ऐवज लंपास केला गेला. असे सारे घडूनही जिल्हा बँकेचे प्रशासन ठिम्मच राहिल्याची ग्राहकांची प्रतिक्रिया आहे. जळगाव नेऊरच्या घटनेनंतर पोलिसांनी श्वान पथकालाही पाचारण केले. या पथकाने तलाठी कार्यालयापर्यंत माग काढून ते तिथे घुटमळत राहिले. या घटनेनंतर बँक अध्यक्षांनी सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्याची सूचना केली. आतापर्यंत दरोडा व लुटीच्या सात घटनांमध्ये बँकेचे एक कोटी आठ लाखाहून अधिकची रक्कम लंपास झाली आहे. येवला येथील लुटीतील ३३ लाखाची रक्कम संशयिताना पकडल्याने परत मिळाल्याचे सांगितले जाते.

सीसी टीव्हीचे काम प्रगतीपथावर
भररस्त्यावरील पोलीस ठाण्या लगत असलेल्या बँकेत अशी घटना घडणे स्वप्नातही अपेक्षित नव्हते. मात्र एकाच पध्दतीने चांदवड, मालेगाव, रानवड आदि ठिकाणी दरोडा टाकण्यात आला आहे. हे प्रशासन आणि पोलिसांसमोर आव्हान आहे. बँकेच्या २१३ शाखांपैकी अनेक शाखेत सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून काही ठिकाणी ठिकाणी ते काम प्रगतीपथावर आहे. सर्व शाखांमध्ये सुरक्षारक्षक ठेवणे बँकेला परवडणारे नाही.
नरेंद्र दराडे (अध्यक्ष, जिल्हा बँक)