तिजोरी फोडण्यात अपयश, संगणक लंपास

नाशिक : अतिशय वर्दळीच्या रविवार कारंजा परिसरात चोरटय़ांनी संकुलातील एका भिंतीला भगदाड पाडून युको बँक लुटण्याचा प्रयत्न केल्याचे सोमवारी उघडकीस आले. रोकड सुरक्षित राहिली मात्र, चोरटय़ांनी सीसी टीव्ही कक्षाची तोडफोड करत बँकेतील दोन संगणक, लॅपटॉप लंपास केले.

शनिवार, रविवारी बँकेला सुटी होती. दोन दिवसांच्या सुटीनंतर सोमवारी सकाळी कर्मचारी नेहमीप्रमाणे बँकेत आल्यानंतर सर्व प्रकार उघड झाला. बँकेचा लोखंडी दरवाजा उघडल्यानंतर सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. बँकेच्या मागील बाजूच्या भिंतीला भगदाड पाडून चोरटे आतमध्ये शिरले असावेत. कपाटे वा अन्य ठिकाणी त्यांनी रोकड शोधण्याचा प्रयत्न केला असावा. तिजोरी फोडता न आल्याने संतापात चोरटय़ांनी कपाटातील कागदपत्रे अस्ताव्यस्त फेकत सीसी टीव्ही कक्षाची, यंत्रणेची तोडफोड केली असण्याची शक्यता आहे. संगणक, लॅपटॉप घेऊन चोरटे पसार झाले.

चोरीची माहिती मिळाल्यावर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे, उपायुक्त अमोल तांबे, सहायक आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी घटनास्थळी दाखल झाले आणि तपासकार्य हाती घेतले. बँकेत धोक्याची सूचना देणारा ‘भोंगा’ बसविण्यात आला आहे. युको बँकेचा तो ‘भोंगा’ वाजला नाही. शिवाय सुरक्षारक्षकही तैनात नसल्याचे सांगितले जात आहे.

काही वर्षांपूर्वी परिसरातील एका दुकानातून किराणा माल टेम्पोत भरून लंपास केला गेला होता. शहरात तातडीने कायमस्वरूपी सीसी टीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे कार्यान्वित करावे, अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे. चोरी प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युको बँकेच्या शाखेत सुरक्षारक्षक तैनात नव्हता. सीसी टीव्ही कॅमेरा यंत्रणेची चोरटय़ांनी तोडफोड केली. यामुळे आसपासच्या अन्य सीसी टीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे चोरटय़ांचा माग काढला जात आहे.

प्राथमिकदृष्टय़ा ही घरफोडी आहे. चोरटय़ांनी तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. पण सुदैवाने त्यांना रोकड लंपास करता आली नाही. संशयितांचे काही धागेदोरे मिळाले असून लवकरच त्यांना पकडण्यात येईल. बँकांना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वारंवार सूचना दिल्या जातात. सर्व बँक शाखांमध्ये ‘क्युआर’ संकेतांक बसविण्यात आले आहे. बँकांची पुन्हा बैठक घेऊन सुरक्षेबाबत सूचना केल्या जातील.

– विश्वास नांगरे,पोलीस आयुक्त, नाशिक