दरोडय़ाचे कलम मागे घेण्याची सेना मंत्र्यांची मागणी
भाजपचा मेळावा उधळून लावण्याचे आंदोलन राजकीय स्वरूपाचे असताना राज्याचे गृहमंत्री व नाशिकचे पालकमंत्री यांच्या दबावामुळे शिवसैनिकांवर दरोडय़ाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप करत शिवसेनेच्या नेत्यांनी जनतेचा सरकारवरील विश्वास उडत चालला असल्याचे टीकास्त्र सोडले.
सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, सहकार राज्यमंत्री दादा भुसे आदींनी नाशिकरोड कारागृहात जाऊन शिवसेना महिला आघाडीच्या सत्यभामा गाडेकर व शिवसैनिकांची भेट घेऊन दिलासा दिला. नंतर पोलीस आयुक्तांची भेट घेऊन सूड भावनेतून ही कारवाई झाली असून दरोडय़ाचे कलम मागे घ्यावे, अशी मागणी संबंधितांनी केली. भाजपने शिवसेनेला गाडण्याची भाषा केली होती. त्याचा समाचार घेताना संबंधितांना जशास तसे उत्तर देण्याचा इशारा नेत्यांनी दिला. संपर्क नेते अजय चौधरी यांनी अतिशय जहरी शब्दात टीकास्त्र सोडल्याने सेना-भाजपमधील मतभेद पुढील काळात आणखी चिघळणार असल्याचे अधोरेखित झाले आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी मराठवाडय़ाबाबत केलेल्या विधानाच्या निषेधार्थ शिवसेनेच्या महिला आणि शिवसैनिकांनी भाजप महिला आघाडीतर्फे आयोजित कार्यक्रमात धुडगूस घालत उधळण्याचा प्रयत्न केला. त्या प्रकरणात स्थानिक भाजप आमदारांच्या मागणीमुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करत शिवसेनेच्या सत्यभामा गाडेकर यांच्यासह नऊ जणांना अटक केली.
न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी नाशिकमध्ये दाखल होऊन आंदोलकांची कारागृहात भेट घेतली. संपूर्ण घटनाक्रमाबाबत माहिती घेऊन संबंधितांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली.
पोलिसी कारवाईवरून सेना नेत्यांनी राज्याचे मुख्यमंत्री व नाशिकचे पालकमंत्री यांच्यावर शरसंधान साधले. उभयतांच्या दबावातून शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. शिवसेनेला संपविण्याची भाषा करणारे संपले आहेत. भाजपने कुटील कारस्थान करणे चुकीचे असून शिवसेना त्यास जशात तसे उत्तर देईल, असा इशारा शिंदे यांनी दिला. संपर्क नेते अजय चौधरी यांनी भाजपवर अतिशय जहरी शब्दात आगपाखड केली.
राज्यातील जनतेचा शासनावरील विश्वास उडत चालला असल्याचा घरचा अहेर त्यांनी दिला. पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांची भेट घेऊन राजकीय आंदोलनात लावलेले दरोडय़ाचे कलम रद्द करण्याची मागणी केली.
शिवसेना गुन्ह्यांना घाबरत नाही. महाराष्ट्राच्या विभाजनाची कोणी भाषा केल्यास शिवसेनेने आजवर आक्रमकपणे आंदोलने केली आहेत.
सूड भावनेतून खोटे गुन्हे दाखल करण्याच्या दबावाला यंत्रणेने बळी पडू नये, अशी अपेक्षा सेना नेत्यांनी व्यक्त केली. शिवसैनिकांवरील अन्याय कदापि सहन केला जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून संबंधित नेत्यांनी भाजपविरोधात आक्रमक होण्याचे सूचित केले आहे. उपरोक्त आंदोलनात भाजपच्या तावडीत सापडलेल्या सेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांना सोडविण्यासाठी कोणी गेले नसल्यावरून नेत्यांनी कानउघाडणी केल्याची चर्चा आहे.