चारुशीला कुलकर्णी

‘नॅब’ शिक्षण विभागाकडे प्रस्ताव पाठविणार

अंध, अपंग असणाऱ्या विशेष बालकांना शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध करता यावी, १० वी आणि १२ वी परीक्षेत त्यांना लेखनिकाअभावी होणारा त्रास दूर व्हावा, यासाठी इस्त्रोच्या काही अभियंत्यांनी पुढाकार घेतला आहे. अभियंत्यांनी ‘रोबो रायटर’ तयार केला असून अंध-अपंगाना प्रश्नपत्रिका सोडविताना लेखनिक म्हणून तो भूमिका पार पाडू शकेल. बुधवारी या संशोधनाची येथील नॅशनल असोसिएशन फॉर दि ब्लाइंड (नॅब) कार्यालयात चाचणी घेण्यात आली. नॅबच्या वतीने शिक्षण विभागाकडे परीक्षेत रोबोचा वापर करण्यासंदर्भात प्रस्ताव पाठविणार आहे.

अंध आणि हात नसलेल्या विद्यार्थ्यांना लेखनिकाची गरज भासते. शालेय तसेच महाविद्यालयीन स्तरावर लेखनिकाचा पर्याय संबंधितांसाठी खुला करून देण्यात आला आहे. बऱ्याचदा लेखनिकाची लेखनशैली, त्याची आकलन क्षमता यावर संबंधित विद्यार्थ्यांचे परीक्षेतील गुण अवलंबून असतात. काही वेळा लेखनिक न मिळाल्याने अशा विद्यार्थ्यांना परीक्षेस मुकावे लागते. अंध आणि अपंग विद्यार्थ्यांची ही अडचण दूर करण्यासाठी इस्त्रोमध्ये काम करणारे धनेश बोरा, वैभव जाधव, प्रवीण गाडे आणि विनय गडा हे चार जण एकत्र आले. त्यांनी ‘रोबो रायटर’ तयार केला.

ज्याद्वारे अंध, अपंगाना लेखनिक मिळेल, शिवाय संपूर्ण शैक्षणिक वर्षांत तो त्यांच्याकडून अभ्यास करून घेईल, अवांतर वाचन करून घेईल. या रोबोला १०८ भाषांचे ज्ञान आहे. सद्यस्थितीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा ओळखत रोबोवर अधिक काम करण्यात येत असल्याचे बोरा यांनी सांगितले. रोबोचा होणारा दुरुपयोग टाळण्यासाठी परीक्षेदरम्यान त्याची मेमरी चिप बदलून नवीन चिप टाकण्यात येईल. जेणे करून विद्यार्थ्यांकडून नकल होण्याचा धोका टळेल. परीक्षेत विद्यार्थी सांगतील आणि रोबो रायटर प्रश्नपत्रिका लिहिणार, अशा पद्धतीने रोबो काम करेल.

नॅबच्या सहकार्याने लवकरच राज्य शिक्षण मंडळाशी चर्चा करून ही सुविधा विद्यार्थ्यांसाठी खुली करून देण्यात येणार आहे. बाजारातील अन्य रोबोंच्या तुलनेत हा रोबो केवळ २० हजारांत उपलब्ध होणार आहे. या रोबोचा प्रत्यक्षात वापर सुरू झाल्यास देशातील ३० लाख अंध-अपंगांना याचा फायदा होईल, असा दावा बोरा यांनी केला आहे.

राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी रोबो रायटर कशा पद्धतीने काम करेल याविषयी माहिती देत, संबंधितांच्या गरजा जाणून घेण्याचा प्रयत्न होत आहे. या संदर्भात बुधवारी नॅबच्या संस्था कार्यालयात कार्यशाळा झाली. यावेळी नॅबचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री, सूर्यभान साळुंखे, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार आदी उपस्थित होते.

शिक्षण मंडळाशी चर्चा करणार

सध्या रोबो रायटर पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी (अंध-अपंग) वापरला. कोल्हापूर येथे याची चाचणी करण्यात आली. तेथे हा प्रयोग यशस्वी झाला. शिक्षण विभागाने मान्यता दिल्यास १० वी आणि १२ वी परीक्षेत यापुढे रोबो रायटरच वापरला जाईल. राज्यात दीड लाखाहून अधिक अंध-अपंग विद्यार्थी आहेत जे १० वी आणि १२ वी, पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षण घेत असून वेगवेगळ्या ठिकाणी काम करत आहेत. या सर्वासाठी रोबो उपयुक्त ठरेल.

– धनेश बोरा (इस्त्रो, अभियंता) वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा

स्पर्धा परीक्षा असो किंवा अन्य परीक्षा. त्यात ‘रोबो रायटर’ महत्त्वपूर्ण ठरेल. या संदर्भात सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर वरिष्ठ स्तरावर नॅबच्या वतीने शासनदरबारी पाठपुरावा करण्यात येईल. सद्यस्थितीत वेगवेगळ्या ठिकाणी याची चाचपणी सुरू आहे. नॅबचे यासाठी आवश्यक सहकार्य असेल.

– रामेश्वर कलंत्री, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार (नॅब पदाधिकारी)