रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे कार्यशाळेचे आयोजन

रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या वतीने आयोजित पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळेत ४५० आबालवृद्धांसह विद्यार्थ्यांनी सहभाग घेत शाडू मातीच्या मूर्ती साकारल्या. दक्षता अभियानचे सहकार्य या उपक्रमास लाभले.गंगापूर रस्त्यावरील सावरकरनगर येथील मते लॉन्स येथे ही कार्यशाळा घेण्यात आली. गणेशाच्या आगमनाचे सर्वाना वेध लागले आहेत. दर वर्षी गणेशोत्सव जवळ आला की, प्रत्येक घरात मूर्ती कोणती आणायची, आरास यावर चर्चा सुरू होते. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विसर्जित करताना जलप्रदूषण होते. पर्यावरणाचे संतुलन बिघडते. यामुळे शाडूमातीच्या मूर्ती आणण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. या मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या तुलनेत महाग असतात. या मूर्ती स्वत:लाच बनविता याव्यात यासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिक दर वर्षी कार्यशाळेचे आयोजन करते. यंदाही आबालवृद्ध तसेच शालेय विद्यार्थ्यांनी अतिशय साध्या सोप्या पध्दतीने शाडूमातीपासून गणराया साकारण्याचा आनंद घेतला. रोटरी क्लबचे अध्यक्ष अ‍ॅड्. मनीष चिंधडे यांनी पर्यावरणपूरक गणपती का करायचा, याची कारणे समजावून सांगितली.

रोटरी क्लबच्या सचिव डॉ. श्रिया कुलकर्णी आणि स्नेहा वाणी यांनी आठ टप्प्यांत बनविल्या जाणाऱ्या गणेशमूर्तीचे प्रात्याक्षिकांसह मार्गदर्शन केले. या उपक्रमाच्या आयोजनात गौरव सामनेरकर, किशोर थेटे, श्रीनंदन भालेराव, मंगेश पिसोळकर यांचे विशेष सहकार्य लाभले. स्वयंसेवक म्हणून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, सीएमसीएस महाविद्यालय, गोसावी परिचारिका रुग्णालयातील सदस्यांनी काम केले. स्वत: निर्मिलेल्या शाडू मातीच्या मूर्तीची स्थापना करणार आणि पर्यावरण संरक्षणाचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला. सहभागी झालेल्यांना प्रमाणपत्रही देण्यात आले.