थेट गरजूंपर्यंत जाऊन कपडय़ांचे वाटप

नाशिक : दीपावलीनिमित्त बाजारपेठेत खरेदीचे सत्र कायम असताना समाजातील एक वंचित घटक या धामधुमीपासून दूर आहे. त्यांना सण उत्सवाची मजा लुटता यावी यासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिक ईस्टच्या वतीने सुरू केलेली ‘कपडा बँक’ वरदान ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत असताना या बँकेचा वापर समाजातील काही उपद्रवी घटकांकडून होऊ  लागला. या अनुभवामुळे रोटरीने आता वैयक्तिक पातळीवर मदतीचे प्रयत्न सुरू केले आहेत.

अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या प्राथमिक गरजा आहेत. त्या भागविण्यासाठी प्रत्येकाचा वैयक्तिक स्तरावर संघर्ष सुरू असतो. समाजातील एक घटक आजही या मूलभूत गरजांपासून वंचित आहे. दोन वर्षांपूर्वी रोटरी क्लब ऑफ नाशिक ईस्टच्या वतीने या घटकासाठी नाशिकरोड येथील फेलोमिना चर्चसमोर ‘कपडा बँक’ हा अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला. समाजातील गरीब व्यक्तींना ऊन, पाऊस, थंडीपासून संरक्षण देण्यासाठी हा उपक्रम उपयोगी ठरेल, अशी अपेक्षा होती. रोटरी इस्टचे अध्यक्ष अतुल मलानी या उपक्रमाचे काम पाहत आहेत. नागरिकांनी दान केलेले कपडे शहरातील गरीब तसेच जिल्ह्य़ातील आदिवासी पाडय़ांवर वाटप केले जातात. शहर परिसरातून जमा झालेले कपडे स्वच्छ धुऊन आणि इस्त्री करून गरजूंना दिले जातात. चर्चसमोर बँक असून दर रविवारी नियोजित वेळेत ती सुरू राहते. महिन्याकाठी शंभरपेक्षा अधिक लोक या उपक्रमाचा लाभ घेत आहेत.

दोन वर्षांत बँकेच्या व्यवस्थापकांना वेगवेगळ्या अनुभवांना सामोरे जावे लागले. या उपक्रमाला मूर्त रूप देताना समाजातील वंचित घटक जो रोजच्या कपडय़ांपासून वंचित आहे, अशा गटाला लक्ष ठरविले गेले. सुरुवातीच्या काळात ज्यांना गरज होती, अशा व्यक्ती आल्या, परंतु वर्षभरात त्याच व्यक्ती पुन्हा पुन्हा येऊन कपडे घेऊन जात. ते कपडे बोहरणींना देत त्यांच्याकडून भांडे खरेदी करण्यासाठी वापरले जात असल्याचा विचित्र अनुभव पदाधिकाऱ्यांना आला. दुसरीकडे, नागरिकांना स्वच्छ धुतलेले कपडे जमा करण्याचे आवाहन करूनही लोक या उपक्रमाकडे कचरा संकलनाप्रमाणे पाहत असून घरात नको असलेले कपडे म्हणून हातात जे येईल ते बँकेत जमा केले जात आहेत.