डॉ. झाकीर हुसेन प्राणवायू गळती दुर्घटना

नाशिक : महानगरपालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयातील प्राणवायू टाकीला गळती होऊन झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत शासनाने जाहीर केली होती. त्याप्रमाणे मुख्यमंत्री सहायता निधीतून १६ मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले आहे. उर्वरित सहा जणांची तांत्रिक बाबींची पूर्तता करून धनादेश दिले जाणार आहेत, अशी माहिती नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

गेल्या बुधवारी डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ही दुर्घटना घडली होती. प्राणवायू संपुष्टात आल्यानंतर रुग्णालयात एकच हाहाकार उडाला. नातेवाईकांनी काही अत्यवस्थ रुग्णांना मिळेल त्या वाहनाने अन्यत्र हलविले. काहींनी बाहेरून सिलेंडर आणले. बरे होण्याच्या मार्गावर असणाऱ्या अनेक रुग्णांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. टाकीतील तांत्रिक दोषामुळे गळती होऊन ही दुर्घटना घडल्याचे महापालिकेने म्हटले आहे.

या दुर्घटनेत मृत झालेले अमरदीप नगराळे यांचे वारस म्हणून त्यांच्या पत्नी मंगला नगराळे यांना धनादेश देण्यात आला. भारती निकम यांचे वारस म्हणून त्यांची मुलगी तेजस्विनी निकम, श्रावण पाटील यांचे वारस म्हणून त्यांच्या पत्नी मालुबाई पाटील, मोहना खैरनार यांचे वारस म्हणून त्यांचे पती देवराम खैरनार यांना तर सुनील झाल्टे यांचे वारस म्हणून त्यांच्या पत्नी सुवर्णा झाल्टे यांना धनादेश देण्यात आला.

सलमा फकीर मोहम्मद शेख यांचे वारस म्हणून त्यांचा मुलगा इरफान, भय्या सांदूभाई सय्यद यांचे वारस म्हणून त्यांचा मुलगा साहिल, प्रवीण महाले यांचे वारस म्हणून त्यांच्या पत्नी जयश्री आदींना धनादेश देण्यात आले.

सहा जणांच्या वारसांना अद्याप प्रतीक्षा

रुग्णालयातील दुर्घटनेत २२ जणांचा मृत्यू झाल्याचे महापालिकेने म्हटले होते. पण, सायंकाळी मृतांची संख्या २४ वर गेल्याचे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले होते. परंतु, शासकीय मदतीवेळी प्रशासकीय यंत्रणेकडून पुन्हा २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सांगितले गेले. दुर्घटनेत मृत झालेल्या २२ रुग्णांपैकी १६ मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले आहे. उर्वरित पंढरीनाथ नेरकर, प्रमोद वालूकर, आशा शर्मा, बापूसाहेब घोटेकर, वत्सलाबाई सूर्यवंशी, नारायण इराक या सहा मृतांच्या वारसांना तांत्रिक बाबींची पूर्तता करून लवकरच धनादेशाचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली.