१७ शिक्षण संस्थांची निवड; आवश्यक निधी जिल्हास्तरावर उपलब्ध
शालेय, महाविद्यालय, संस्था स्तरावर भरविण्यात येणाऱ्या विज्ञान प्रदर्शनातून विविध अविष्कार पहावयास मिळतात. स्थानिक समस्यांचा आधार घेत तयार होणारे प्रकल्प हे भविष्यातील अनेक बदलांची नांदी ठरू शकतात. या अविष्कारातून ग्रामीण भागाचा चेहरा बदलावा तसेच मूलभूत सोयी-सुविधांचा तंत्रज्ञानाच्या आधारे विकास व्हावा, यासाठी शासन उन्नत महाराष्ट्र अभियानच्या माध्यमातून सक्रिय झाले आहे. यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रनिकेतन व अन्य शैक्षणिक संस्था व संशोधनामधील १७ निवडक संस्थांची निवड करण्यात आली असून आवश्यक निधीही जिल्हास्तरावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
शैक्षणिक अभ्यासक्रमातील तांत्रिक बाबींची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी, यासाठी पर्यावरण, ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन आदी विषयांवर सातत्याने प्रदर्शनाच्या माध्यमातून नव्या कल्पनांचा वेध घेण्यात येतो. यातुन नवे अविष्कार अनुभवतांना या संकल्पना तांत्रिकदृष्टय़ा अभ्यास करत प्रत्यक्ष अंमलात येऊ शकतात. याचा उपयोग ग्रामीण भागाचा चेहरा बदलण्यासाठी करण्याचा मनोदय यामागे आहे.
आजही ग्रामीण भागात स्वच्छता, शौचालये, सांडपाणी व्यवस्थापन, पिण्याचे शुध्द पाणी, चांगला रस्ता आदी सुविधांची वानवा भासते. खेडय़ांचा विकास या हेतुने अभियानाची आखणी झाली आहे. यामध्ये राज्यापुढील विकास विषयक समस्यांचा वेध घेऊन स्थानिक पातळीवरील समस्यांची उकल करण्यासाठी शासकीय यंत्रणाचा आधार घेत कृती आराखडा करण्यात येणार आहे. त्यात योग्य समन्वय रहावा, यासाठी समिती गठीत करत प्रकल्प समन्वय कक्ष, तंत्रज्ञान आणि विकास कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच गरजेनुसार शैक्षणिक क्षेत्रातून मनुष्यबळ उपलब्ध करून घेत त्यांना आवश्यक माहिती, सेवा दिल्या जातील. या प्रक्रियेतील घडामोडींचा राज्यस्तरावर वेळोवेळी आढावा घेतला जाईल. अंतिम टप्पात प्रकल्प पुर्तीनंतर हा प्रकल्प, या संदर्भातील माहिती माहिती कोशाच्या माध्यमातून खुली करून दिली जाणार आहे.
दरम्यान, अभियानाच्या माध्यमातून प्रामुख्याने मनरेगाचे सोशल ऑडीट व नियोजन, ग्राम स्वच्छता, शौचालये, सांडपाणी व्यवस्थापन या संदर्भातील नियोजन आराखडा, अंदाजपत्रक तयार करतांना त्याचा दर्जा, मूल्यांकनावर काम अपेक्षित आहे.
लघु उद्योग व ग्राम उद्योग यांची उत्पादकता व कार्यक्षमता वाढवणे, महापालिका व नगरपालिका स्तरावर भेडसावणारा घनकचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा, उर्जा लेखा परीक्षण व मलनि:स्सारण आदी विषयांवर शासकीय योजनांची अंमलबजावणी होत असतांना त्यात येणाऱ्या अडथळ्यांचे तांत्रिक विश्लेषण केले जाणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना संशोधनातील नवी दालने खुली होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरचा दर्जा राखता येणार आहे.

विद्यार्थ्यांच्या कल्पनाविष्काराला आयाम
अभियानाच्या माध्यमातून राज्य सरकार काही प्रासंगिक तंत्रज्ञान, नियोजन वा मूल्यांकनाच्या कामासाठी शिक्षण संस्थेच्या विकास व तंत्रज्ञान कक्षामार्फत विद्यार्थ्यांशी संपर्क साधेल. या माध्यमातून विद्यार्थी स्वतंत्ररित्या कक्षाशी समन्वय साधत प्रत्यक्ष कामाला सुरूवात करू शकतात. त्यासाठी तांत्रिक, सांख्यिक, आर्थिक यासह अन्य सेवा सुविधा सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहे. हा निधी जिल्हा नियोजन आराखडय़ात राखीव ठेवलेल्या निधीतून उपलब्ध होईल.