नाशिक : गुन्हेगारीचा आलेख उंचावत असताना ग्रामीण पोलिसांच्या दृष्टीने बहुधा भ्रमणध्वनी हरविणे, चोरी तसा किरकोळ प्रकार असावा. त्यामुळे तक्रार देऊनही एकतर प्रारंभी गुन्हाच दाखल होत नाही आणि तक्रार अर्ज दिल्यास पोहोच दिली जात नाही. तो अर्ज स्वीकारलाच तर पुढे तपासाची प्रगती याबद्दलदेखील माहिती मिळत नाही. लासलगाव पोलीस ठाण्यात असा अनुभव नाशिकच्या एका तक्रारदाराला घ्यावा लागला.

११ जानेवारी रोजी लासलगाव येथे काही कामानिमित्त नाशिक येथील अजय हातेकर हे गेले होते. बाजारतळ रस्त्यावर हातेकर यांचा भ्रमणध्वनी रस्ता ओलांडत असताना खिशातून पडला. कोणीतरी तो उचलून घेऊन गेले. हे काही जणांनी पाहिले. यासंदर्भात हातेकर हे लासलगाव पोलीस ठाण्यात गेले. त्यांनी गहाळ झालेला भ्रमणध्वनी कोणीतरी लंपास केल्याची लेखी अर्जाद्वारे तक्रार दिली. त्यावेळी उपस्थित पोलिसांनी तक्रारदाराची हजेरी घेतली. भ्रमणध्वनी नीट सांभाळता येत नाही का, असेही ऐकविले. दिलेल्या अर्जाची पोहोचही हातेकरांना देण्यात आली नाही. त्यानंतर हातेकर यांनी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे वारंवार संपर्क साधला. परंतु प्रतिसाद मिळाला नाही.

हातेकरांच्या भ्रमणध्वनीत दोन क्रमांक होते. ते क्रमांक बंद करू नये, सायबर गुन्हे शाखेकडे याबद्दल माहिती देऊन भ्रमणध्वनीचा शोध घेतला जाईल, असे पोलिसांकडून सांगितले गेले. त्या अनुषंगाने तक्रारदाराने नाशिक ग्रामीण मुख्यालयात सायबर गुन्हे शाखेकडे जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा लासलगाव पोलीस ठाण्याकडून भ्रमणध्वनीबाबत कोणतीही माहिती आपल्याकडे आली नसल्याचे सांगितले गेले. यामुळे तक्रारदाराला धक्का बसला. भ्रमणध्वनीसंदर्भातील तक्रार पोलिसांनी बेदखल केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

लहान-मोठी कोणत्याही वस्तूची चोरीची घटना असो, त्याची दखल पोलिसांकडून घेतली जाते. उपरोक्त घटनेत नेमके काय घडले, याची माहिती घेतली जाईल. तपासात दिरंगाई झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.

– डॉ. आरती सिंह (पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण)