महात्मा फुले कला दालनात विक्रीला प्रतिबंध

नाशिक : स्मार्ट सिटीअंतर्गत नूतनीकरण झालेल्या महात्मा फुले कला दालनाच्या नियमावलीचा फटका ग्रामीण कारागीर, प्रामुख्याने महिलांना बसला आहे. कला दालनात आता केवळ कला, प्रदर्शन सादरीकरणास परवानगी असून विक्रीला बंदी आहे. या नियमामुळे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त खादी-ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने आयोजित प्रदर्शनाला कला दालन नाकारले गेले. पालिकेने इदगाह मैदानावर पर्यायी जागा दिली. मात्र, स्थळ बदलल्याने ग्रामीण कारागीर, उद्योजकांनी निर्मिलेल्या वस्तूंना अपेक्षित बाजारपेठ उपलब्ध करण्याचा उद्देश साध्य होऊ शकला नाही. मध्यवर्ती, वर्दळीच्या भागातील नेहमीची जागा न मिळाल्याने ही स्थिती ओढावल्याची कारागिरांची खंत आहे.

महाराष्ट्र राज्य खादी-ग्रामोद्योग मंडळामार्फत तीन दिवसीय ग्रामोद्योग प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन इदगाह मैदानावर करण्यात आले. गुरुवार हा या प्रदर्शनाचा अखेरचा दिवस होता. मैदानातील एका कोपऱ्यात भरलेले हे प्रदर्शन दुर्लक्षित राहिले. त्र्यंबक रस्त्यावरील दर्शनी भागात फलक लावले गेले. मात्र अखेपर्यंत अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे होते. दरवर्षी खादी ग्रामोद्योग मंडळ हे प्रदर्शन आयोजित करते. मागील काही वर्षांपासून ते शालिमारलगतच्या महात्मा फुले कला दालन येथे भरत होते. मध्यवर्ती भागातील प्रदर्शनास शेकडो नागरिक भेट द्यायचे. चांगली विक्री व्हायची. यंदा जागा बदलल्याने फारशी विक्री झाली नसल्याचे महिला विक्रेत्यांनी सांगितले.

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत महाकवी कालिदास कलामंदिर आणि महात्मा फुले कलादालन यांच्या नूतनीकरणावर सुमारे १० कोटी रुपये खर्च करण्यात आले. कलादालन वातानुकूलित केले गेले असून भाडेदरातही लक्षणीय वाढ केली गेली आहे. कलादालन आता केवळ कला प्रदर्शन, चित्र-शिल्प प्रदर्शन, चर्चासत्र, व्याख्यानमाला अशा उपक्रमांसाठी भाडेतत्वावर दिले जाते. केवळ कला सादरीकरण हा त्याचा उद्देश निश्चित करण्यात आला. तिथे वस्तूंच्या विक्रीला प्रतिबंध आहे. अशा उपक्रमासाठी तो भाडेतत्त्वावर दिला जात नाही. या नव्या नियमामुळे खादी ग्रामोद्योग मंडळाला ग्रामोद्योग प्रदर्शनासाठी महात्मा फुले कला दालन मिळाले नाही. यामुळे मंडळाला ऐनवेळी नव्या जागेची शोधाशोध करावी लागली. ती जागा मिळाली, प्रदर्शनही पार पडले. मात्र मूळ उद्देश अधांतरी राहिल्याची विक्रेत्यांची भावना आहे.

प्रदर्शनास कलावंत धजावतील का?

कला दालनात कला प्रदर्शनासाठी सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेकरिता खालील आणि वरील मजल्यासाठी एकसमान म्हणजे प्रत्येकी २० हजार रुपये भाडे आहे. चर्चासत्र, व्याख्यानमालेसाठी उपरोक्त काळात १० हजार रुपये भाडे आहे. तयारीसाठी आधी जागा हवी असल्यास अतिरिक्त पैसे मोजावे लागतात. कलावंताने कला, चित्र किंवा शिल्प प्रदर्शन भरवले तरी त्याला तिथे कोणतीही विक्री करता येणार नाही. या नियमावलीने कला दालनात प्रदर्शन सादरीकरणास कोण धजावेल, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.

स्मार्ट सिटीअंतर्गत नूतनीकरण झाल्यानंतर नियमावलीत बदल करण्यात आले. त्यानुसार महात्मा फुले कला दालन केवळ कला प्रदर्शनाच्या सादरीकरणासाठी दिले जाते. कोणत्याही वस्तूंच्या विक्रीसाठी ते दिले जात नाही. खादी, ग्रामोद्योग मंडळाचे प्रदर्शन हा शासकीय उपक्रम आहे. पालिकेने त्यांना एका दिवसात पर्यायी जागेची व्यवस्था करून दिली.

-प्रशांत पगार (मिळकत विभाग)

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने ग्रामीण कारागीरांना बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी दरवर्षी ग्रामोद्योग प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. मागील काही वर्ष हे प्रदर्शन महात्मा फुले कला दालनात झाले होते. ती मध्यवर्ती जागा आल्याने नागरिक मोठय़ा संख्येने भेट देतात. आता कला दालन प्रदर्शन आणि विक्रीसाठी देता येणार नसल्याचा नियम पुढे करण्यात आला. यामुळे ती जागा प्रदर्शनासाठी मिळाली नाही.

-सीताराम दळवी (जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी)