25 April 2019

News Flash

काँग्रेस कार्यालय गजबजले

जिल्हाध्यक्षपदाच्या खांदेपालटानिमित्त कार्यकर्त्यांची मोर्चेबांधणी

नाशिक जिल्हा काँग्रेस कार्यालयात झालेली पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची गर्दी

जिल्हाध्यक्षपदाच्या खांदेपालटानिमित्त कार्यकर्त्यांची मोर्चेबांधणी

नाशिक : विधानसभा, लोकसभा निवडणुकीनंतर नेते, कार्यकर्त्यांना पारख्या झालेल्या येथील काँग्रेस कार्यालयाची तृष्णा मंगळवारी काहीअंशी शमली. मध्यवर्ती भागात असूनही अस्तित्व अधोरेखित न होणारे हे कार्यालय या दिवशी ओसंडून वाहिले. अगदी जुन्याजाणत्या नेत्यांपासून तरुण कार्यकर्ते पक्ष कार्यालयात दाखल झाले. निमित्त होते, जिल्हाध्यक्षपदाच्या खांदेपालटाचे. काही नेत्यांनी हे पद म्हणजे काटेरी मुकुट असल्याची जाणीव करून दिली, तर काहींनी गट-तटाच्या राजकारणाने पक्षाचे मोठे नुकसान झाल्याकडे लक्ष वेधले. हे पद काटेरी मुकुट असल्याचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी मान्य केले. पक्षातील गटबाजी संपुष्टात आणून काँग्रेसचा जनाधार वाढविण्यासाठी प्रयत्नरत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी १८ वर्षांनंतर फेरबदल करण्यात आले. नूतन अध्यक्षांच्या पदग्रहण सोहळ्याच्या माध्यमातून काँग्रेसने शक्तिप्रदर्शन करण्याची संधी सोडली नाही. मावळते अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांच्याकडून डॉ. शेवाळे यांनी कार्यभार स्वीकारला. यावेळी उत्तर महाराष्ट्राचे निरीक्षक वामसीचंद रेड्डी, जिल्ह्य़ाचे सहप्रभारी डी. जी. पाटील यांच्यासह आमदार निर्मला गावित, वनाधिपती तथा माजी आमदार विनायकदादा पाटील, शहराध्यक्ष शरद आहेर, माजीमंत्री डॉ. शोभा बच्छाव, माजी आमदार अनिल आहेर आदी उपस्थित होते. ग्रामीण भागासह धुळे लोकसभा मतदार संघातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली. काँग्रेस कार्यालयातील सभागृह उपस्थितांनी तुडुंब भरले. व्यासपीठावरही गर्दी झाली होती. उत्साहाच्या भरात कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष करत न्यायालयाचे नियम धाब्यावर बसविले.

महात्मा गांधी रस्त्यावर शहर, जिल्हा काँग्रेसचे कार्यालय आहे. मागील निवडणुकीनंतर या कार्यालयाची रया गेली. प्रदीर्घ काळ काही मोजके नेते, पदाधिकारी वगळता कार्यकर्ते तसे कार्यालयात दिसलेच नव्हते. ही कसर या कार्यक्रमातून भरून काढण्याची धडपड झाली. कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संपत सकाळे यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळण्यासाठी आर्थिक क्षमता महत्त्वाची असल्याचे नमूद केले. ज्येष्ठांचा अवमान होणार नाही याची काळजी घेऊन सर्वाना सोबत घेऊन चालावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आमदार गावित यांनी जिल्हाध्यक्षपद हा काटेरी मुकुट असून नूतन अध्यक्षांसमोरील आव्हाने मांडली. मावळत्या जिल्हाध्यक्षांनी तालुक्याच्या कारभारात कधी हस्तक्षेप केला नाही. उलट पदाधिकारी, कार्यकर्त्यांना काम करण्यास निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले. आपसातील गट-तट बाजूला ठेवून संघटन मजबूत करून एकत्रितपणे लढल्यास यश निश्चित मिळेल, याकडे गावित यांनी लक्ष वेधले. अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाची जिल्ह्य़ात बिकट अवस्था झाल्याचे सांगून त्यास उर्जितावस्था देण्याचे आवाहन केले.

पक्षातील गटबाजी संपुष्टात आली असून आता पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा पक्षश्रेष्ठी हा केवळ एकच गट आहे. सर्वाना सोबत घेऊन काम केले जाईल. जो काम करणार नाही, त्याला समज देऊन काम करून घेतले जाईल. पक्षश्रेष्ठींनी दाखविलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. काटेरी मुकूट यशस्वीपणे सांभाळून पक्षाचा जनाधार वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल.

– डॉ. तुषार शेवाळे (जिल्हाध्यक्ष, काँग्रेस)

First Published on February 6, 2019 2:22 am

Web Title: rush in nashik congress office ahead of elections