X

कॅरम स्पर्धेत साहिल पंडित, महेक शेख यांना विजेतेपद

स्पर्धेत इगतपुरी, सिन्नर, लासलगाव, सटाणा, एचएएल ओझर, घोटी, दिंडोरी, देवळा आदी ठिकाणच्या मुला-मुलींनी सहभाग घेतला.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आणि नाशिक जिल्हा कॅरम संघटनेच्या सहकार्याने येथील शिवछत्रपती शिवाजी क्रीडा संकुलात आयोजित जिल्हा शालेय कॅरम स्पर्धेत १७ वर्षे वयोगटात साहिल पंडित आणि महेक शेख यांनी विजेतेपद मिळविले.

स्पर्धेत इगतपुरी, सिन्नर, लासलगाव, सटाणा, एचएएल ओझर, घोटी, दिंडोरी, देवळाली कॅम्प, कळवण, देवळा आदी ठिकाणच्या मुला-मुलींनी सहभाग घेतला. मुलांचा अंतिम सामना देवळाली कॅम्पच्या डॉ. सुभाष गुजर स्कूलचा राजीव शर्मा आणि इगतपुरीच्या महात्मा गांधी हायस्कूलचा साहिल पंडित यांच्यात झाला.

साहिलने हा सामना २५-१९, २५-१६ असा, तर मुलींमध्ये इगतपुरीच्या महात्मा गांधी हायस्कूलच्या महेक शेखने आपल्याच तालुक्यातील घोटी येथील नित्यानंद इंग्लिश स्कूलच्या माधुरी अडोळेचा २-० असा पराभव करून विजेतेपद मिळविले.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी विभागीय आणि राज्य स्पर्धेतही चांगली कामगिरी करून नाशिकचे नाव विजेत्यांनी उज्ज्वल करावे, अशी अशा व्यक्त केली.

यावेळी कॅरम संघटनेचे उपाध्यक्ष तथा क्रीडा संघटक आनंद खरे, कबड्डी प्रशिक्षक प्रशांत भाबड, शासनाचे बास्केटबॉल प्रशिक्षक राजेश क्षत्रिय, हॉकी प्रशिक्षक आरती हलंगळी, क्रीडा संघटक नितीन हिंगमिरे आदी उपस्थित होते.