तीन जणांना पोलीस कोठडी

मालेगाव : अवैधरीत्या विक्रीसाठी शहरात आणलेल्या ४० धारदार तलवारी येथील विशेष पोलीस पथकाने मंगळवारी सायंकाळी जप्त केल्या. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून एक संशयित फरार झाला आहे.

बेकायदा विक्रीच्या उद्देशाने एका रिक्षाद्वारे शहरात शस्त्र आणले जाणार असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांना मिळाली होती. या माहितीनुसार उपनिरीक्षक आर. के. घुगे यांच्या नेतृत्वाखालील विशेष पोलीस पथकाने राष्ट्रीय महामार्गावर पाळत ठेवत संशयास्पद रिक्षा थांबविण्यात आली.

या रिक्षाची झडती घेतली असता तब्बल ४० तलवारींची वाहतूक होत असल्याचे आढळून आले. या सर्व तलवारी, रिक्षा आणि दोन भ्रमणध्वनी असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. रिक्षातील मोहम्मद आसिफ शकिर अहमद, इरफान अहमद हबीब अहमद आणि अतिक अहमद सलीम अहमद या तिघा संशयितांना ताब्यात घेतले. या कारवाई दरम्यान मोहम्मद मेहमूद अब्दुल रशिद हा आणखी एक संशयित पोलिसांना गुंगारा देत फरार झाला.

या प्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलीस कर्मचारी पंकज भोये, प्रकाश बनकर, भूषण खैरनार आणि संदीप राठोड यांनी सहभाग घेतला. संशयितांनी या तलवारी कुठून खरेदी केल्या आणि शहरातील कुणाला त्या विक्री करण्याचा प्रयत्न होता,याचा पोलीस शोध घेत आहेत.  दरम्यान, संशयितांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.