चौदा जणांवर गुन्हा
देवळाली कॅम्प शिवारातील कोटय़वधींचा भूखंड दाऊदी बोहरा जमात नावाने ट्रस्ट केल्याचे भासवत संगनमताने परस्पर हस्तांतरित करून फसवणूक केल्या प्रकरणी १४ जणांविरुद्र नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर व परिसरातील जमिनींचे भाव गगनाला भिडल्यामुळे या क्षेत्रात गैरप्रकार वाढीस लागले आहेत. बनावट कागदपत्रे वा नावाने भूखंड विक्रीचे काही प्रकार याआधीही उघडकीस आले होते.
देवळाली कॅम्प शिवारात तक्रारदार सैफुद्दीन जरीवाला (७२) यांच्या मालकीचा १३९३.१० चौरस मीटर क्षेत्राचा भूखंड आहे.
हा भूखंड संशयितांनी आपल्या मालकीचा असल्याचे भासवत दाऊदी बोहरा जमात नावाने ट्रस्ट स्थापन केल्याचे दर्शविले. या ट्रस्टचे आपण व्यवस्थापक असल्याचे दाखवून बनावट कागदपत्रे तयार केली. त्यानंतर मूळ मालकाचे रेकॉर्डवरील नाव कमी करण्यासाठी बनावट स्वाक्षरीही केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या बाबत जाहीरपणे निवेदन न देता विहितगाव तलाठी कार्यालयात फेरफार नोंदी करण्यात आल्या. मुखत्यारपत्राच्या साहाय्याने उपरोक्त भूखंडाचे साठेखत करण्यात आले. या व्यवहारास इतरांनी सहमती दर्शविल्याचे संशयितांनी दर्शविले. भूखंड व्यवहाराची नोंद दुय्यम निबंधक कार्यालयात करण्यात आली. खोटी माहिती देऊन, बनावट स्वाक्षरी करून हा व्यवहार झाल्याचे तक्रारदार मूळ मालकाने म्हटले आहे. या प्रकरणी श्रीराम अडेनवाला, महादेव रामण्णा तालकेरी, भारत चंद्रकांत मेहता, मुन्नी हसनबी यांच्यासह एकूण १४ जणांविरुद्र गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.