जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात अधिक प्रमाणावर भेडसावणाऱ्या वाळूमाफियांचे अर्थकारण आणि त्याभोवती घुटमळणारे राजकारण असा विषय रुपेरी पडद्यावर येत असून या चित्रपटाशी नाशिक जिल्ह्यातील मंडळी मोठय़ा संख्येने संबंधित आहेत. नाशिकची निर्मिती व दिग्दर्शन असलेला तसेच जिल्ह्यातील देवळा, सटाण्यासह नाशिक शहरात चित्रीत झालेला ‘रेती’ हा चित्रपट एप्रिल महिन्यात प्रदर्शित करण्याचा मानस असल्याचे दिग्दर्शक सुहास भोसले व अथर्व मूव्हीज्चे प्रमोद गोरे यांनी सांगितले.

रेती या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले. सामान्य माणसाला वाळू केवळ बांधकाम व्यावसायिकांशी संबंधित विषय वाटतो. पण, वाळूकारण सामान्यांच्या जीवनापर्यंत कसे पोहोचलेय आणि संपूर्ण महाराष्ट्राची घडी कशी बिघडते याचे वास्तववादी चित्रण त्यात आहे. त्यामुळेच नाशिक आणि मुंबई परिसरात प्रत्यक्ष जागेवर सर्व चित्रीकरण करण्यास प्राधान्य देण्यात आले.

सुहास भोसले दिग्दर्शित या चित्रपटाची कथा, संवाद देवेंद्र कापडणीस यांनी लिहिले आहे. प्रसिध्द गायक शान यांच्या सुपरबिया या कंपनीने संगीत दिले. संजय कृष्णाजी पाटील व प्रमोद गोरे यांनी लिहिलेली गीते शान निहीरा जोशी व अपेक्षा दांडेकर यांनी गायली आहेत. चित्रपटात किशोर कदम, चिन्मय मांडलेकर, शशांक शेंडे, संजय खापरे, सुहास पळशीकर, विद्याधर जोशी, दीपक करंजीकर, मोसमी तोंडवळकर, भाग्यश्री राणे, ज्ञानेश्वर वाघ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे निर्मिती संयोजन, कला व दिग्दर्शन अरूण रहाणे यांनी केले आहे. कृष्ण मरकर व पंकज कोठावदे यांनी निर्मितीची बाजू सांभाळली आहे. कला दिग्दर्शन प्रसाद रहाणे यांचे आहे.