शिवकार्य गडकोट मोहिमेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रविवारी गिरणारे येथील प्राचीन अहिल्यादेवी होळकर बारव आणि परिसराची स्वच्छता केली जाणार आहे. या मोहिमेत शिवकार्यचे दुर्गसंवर्धक, गिरणारे गावातील ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, शाळा तसेच स्थानिक मंडळांचे कार्यकत्रे सहभागी होणार आहे.
सध्या महाराष्ट्रात सर्वत्र दुष्काळी स्थिती आहे. पाण्याची तीव्र टंचाई असताना पूर्वजांनी बांधलेले जलस्रोत हे पर्यावरणपूरक आहे. त्यांचे संवर्धन काळाची गरज आहे. त्या कामी शिवकार्य गडकोट मोहीम गावात पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती करणार आहे.
अडिचशे वर्षांपूर्वीची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या काळातील कलाकुसरीची बारव तसेच गावातील जुन्या पेशवेकालीन विहिरी, शिवकालीन तळ्यांचा गावाच्या पाण्यासाठी उपयोग होतो. हे प्राचीन इतिहासाचे साक्षीदार सध्या कचऱ्याच्या विळख्यात सापडले आहेत. त्या ठिकाणी साफसफाई होणे गरजेचे असल्याचे लक्षात घेऊन हा उपक्रम आयोजित केला आहे. या सामाजिक उपक्रमात सर्वानी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवकार्य गडकोट मोहिमेच्या वतीने करण्यात आले आहे.