संजय धारणकर श्रद्धांजली अर्पणाच्यावेळी नोकरभरतीसाठी संपाचा इशारा

नाशिक : कर विभागातील साहाय्यक अधीक्षक संजय धारणकर यांच्या आत्महत्येच्या घटनेनंतर शिवसेनाप्रणित म्युन्सिपल कर्मचारी, कामगार सेना आक्रमक झाली असून सात किंवा १५ दिवसांच्या संपावर जाण्याची तयारी सुरू झाली आहे. पालिकेत मनुष्यबळ कमी असल्यामुळे आहे त्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कामांचा ताण आहे. या स्थितीत धारणकर यांची आत्महत्या दुर्दैवी, क्लेशकारक असून अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये असलेले दहशतीचे वातावरण बदलावे, यासाठी लवकरच द्वारसभा घेऊन प्रशासनाला संपाची नोटीस देण्याचे कामगार सेनेने ठरवले आहे.

मुख्यालयातील घरपट्टी विभागात कार्यरत धारणकर यांनी गुरूवारी आपल्या राहत्या घरी गळफास घेतला. या घटनेचे सावट दुसऱ्या दिवशी पालिकेतील कामकाजावर दिसून आले. पालिकेत कमालीची शांतता दिसून आली. म्युन्सिपल कर्मचारी, कामगार सेनेतर्फे सकाळी मुख्यालयात धारणकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी महापौर रंजना भानसी, पालिका आयुक्त तुकाराम मुंढे, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, स्थायी सभापती हिमगौरी आहेर-आडके, गटनेते, अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. कामगार सेनेचे प्रमुख प्रवीण तिदमे वगळता इतर कोणी फारसे बोलले नाहीत. पालिकेतील अधिकारी-कर्मचारी तणावात काम करत असून त्यांच्यावरील अतिरिक्त कामाचा तणाव कमी न केल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागणार असल्याचा इशारा तिदमे यांनी दिला. महापालिकेच्या इतिहासात कामाच्या तणावामुळे एखाद्या अधिकाऱ्याला आत्महत्या करावी लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. कामाचे सुयोग्य नियोजन करावे आणि भरती प्रक्रियेसाठी पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली.

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या अतिशय कमी असल्याने कार्यरत असणाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण येत असल्याची बाब कामगार सेनेने वेळोवेळी निदर्शनास आणून दिली. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे धारणकर यांना जीव गमवावा लागल्याचा आरोप तिदमे यांनी केला. सतत निलंबन, बडतर्फ यांसारख्या कारवाईची भीती अधिकारी आणि कर्मचारी वर्गात निर्माण केली जात आहे. कामाचा अतिरिक्त ताण वाढल्याने आत्महत्येसारखी पावले उचलली जात आहेत. पालिका प्रशासनाने त्वरित सखोल चौकशी करून धारणकर यांच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, कामाचा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी सुयोग्य नियोजन व्हावे, प्रशासनाने तातडीने नोकर भरती करण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी निवेदनाद्वारे आयुक्तांकडे करण्यात आली.

शहरात १४ हजार कर्मचाऱ्यांची गरज

पालिकेत सध्या पाच हजार कर्मचारी कार्यरत आहेत. नवीन आकृतिबंधानुसार शहराच्या लोकसंख्येच्या आधारे १४ हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांची गरज आहे. आकृतिबंधाचा विषय शासनाकडे प्रलंबित आहे. या घटनेच्या पाश्र्वभूमीवर, लवकरच द्वारसभेचे आयोजन करण्यात येणार आहे. कामगार सेना सात किंवा १५ दिवस संप पुकारण्याची तयारी करत आहे. त्यासंबंधीची नोटीस प्रशासनाला दिली जाणार असल्याचे तिदमे यांनी सांगितले.

कामगार सेनेचे आवाहन

महापालिकेत अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण असल्यास अथवा वरिष्ठ अधिकारी दबाब आणत असल्यास अधिकारी, कर्मचाऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये. संबंधितांनी कामगार सेनेशी संपर्क साधावा. संघटना तुमच्यासोबत आहे, असे आवाहन तिदमे यांनी केले.