News Flash

केंद्राचा राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न!

बहुमताचा अहंकार जनतेसमोर चालत नाही.

संग्रहीत

शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांचा आरोप

नाशिक : दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात भाजप सरकारने आडमुठी भूमिका घेतली आहे. शेतकरी पुन्हा हिंसक झाल्यास त्याची जबाबदारी भाजपवर असेल. किंबहुना केंद्र सरकार शेतकऱ्यांना हिंसक बनवून देशात अराजकता निर्माण करीत राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप खा. संजय राऊत यांनी के ला आहे.

शनिवारी येथे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे उद्घाटन खा. राऊत आणि डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना राऊत यांनी शेतकरी आंदोलनाबाबत भाजप सरकार गंभीर नसल्याचे नमूद केले.

बहुमताचा अहंकार जनतेसमोर चालत नाही. चार, पाच उद्योजक मित्रांसाठी हे तीन नवे कृषी कायदे आणल्याचा शेतकऱ्यांचा आक्षेप आहे. हे कायदे शेतकरी हिताचे असल्याचे शेतकऱ्यांना वाटत नाही. त्यामुळे सरकारने दोन पावले मागे येऊन शांतता प्रस्थापित करणे, नव्याने कायदा करणे देशाच्या हिताचे असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. महाविकास आघाडी सरकार स्थापनेवेळी विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे असावे हे ठरलेले आहे. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अन्य मित्र पक्षांनी त्यावर दावा केलेला नाही.

तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील. एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषणे करणारा शर्जिल उस्मानी उत्तर प्रदेशमधून इकडे आला. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी तिकडेच कठोर कारवाई केली असती तर संबंधित व्यक्ती देशभर फिरली नसती. उत्तर प्रदेश पोलिसांनी शर्जिलला पकडण्यात महाराष्ट्र पोलिसांना सहकार्य करावे. एल्गार परिषदेसारख्या कार्यक्रमामुळे दंगली होणार असतील तर त्यांना परवानगी देण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, असेही ते म्हणाले.

राज्यपालांना परत बोलवावे

१२ आमदारांच्या नियुक्त्या राजकीय नाहीत. घटनेने दिलेल्या अधिकारानुसार राज्य सरकारने त्या शिफारसी केल्या आहेत. त्या शिफारसी मान्य करणे राज्यपालांचे कर्तव्य आहे. राज्यपाल आपल्या कर्तव्याला चुकत असतील तर केंद्र सरकारने घटनेचे पालन न करणाऱ्या महाराष्ट्राच्या राज्यपालांना परत बोलवायला हवे, असे खा. राऊत यांनी नमूद केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2021 3:15 am

Web Title: sanjay raut allegation on the issue of farmers movement akp 94
Next Stories
1 ५० लाखांचा निधी मिळण्याबाबत साशंकता
2 शहरात विद्यार्थ्यांची अल्प उपस्थिती तर, ग्रामीण भागात प्रतिसाद
3 देवमामलेदारांचे चरित्र प्रेरणादायी
Just Now!
X