17 December 2017

News Flash

संत गाडगेबाबा आश्रमशाळेत ‘किलबिल किलबिल पक्षी बोलती..’

दरवर्षीप्रमाणे यंदाही नेचर क्लब ऑफ नाशिकच्या पक्ष्यांच्या शाळेची घंटा वाजली.

प्रतिनिधी, नाशिक | Updated: April 21, 2017 12:30 AM

पक्ष्यांच्या खाद्यासाठी टाकाऊ साहित्यातून भांडे तयार करताना पक्षीप्रेमी  

शाळेच्या आवारात विविध पक्ष्यांचा मुक्तसंचार 

एरवी बालगीतांत हरवलेले ‘किलबिल किलबिल पक्षी बोलती..’ गीताच्या बोलांची अनुभूती पर्यावरणप्रेमी नाशिककरांना संत गाडगेबाबा आश्रमशाळेच्या आवारात मिळत आहे. शहरातील विविध प्रकारच्या पक्ष्यांचा शाळेच्या आवारात मुक्तसंचार असून येथील शाळा व्यवस्थापनांकडून त्यांची विशेष नोंद ठेवली जात आहे. पक्ष्यांच्या लकबी, त्यांच्या खोडय़ा, अन्न मिळवण्यासाठी चालणारी धडपड.. हे सारे पर्यावरणप्रेमींसाठी कुतूहल ठरत आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही नेचर क्लब ऑफ नाशिकच्या पक्ष्यांच्या शाळेची घंटा वाजली. यंदा शाळेने आपला वर्ग बदलला असून गोदा किनारी असलेल्या संत गाडगेबाबा आश्रमशाळेत मुक्काम हलविला आहे. शालेय साहित्याची जमवाजमव करण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी पुढाकार घेतला आहे.

टाकाऊ तून टिकाऊ चा प्रयोग या ठिकाणी केला जात आहे. प्लास्टिक बाटल्यांपासून पाण्याची व खाद्याची सोय, प्लास्टिक बरण्यापासून फुडर, नारळाच्या कवटय़ांपासून घरटी आणि खाद्य ठेवण्याची वाटी, खराब टायरपासून तळी असा कल्पनाशक्तीचा आविष्कार पर्यावरणप्रेमींनी येथे केला असल्याचे पाहावयास मिळते. खराब टायरपासून तळी बनवत त्यामध्ये मासे सोडण्यात येणार आहे. पाणपक्ष्यांसाठी खास माशांचीही व्यवस्था याद्वारे करण्यात येणार आहे. माणसांची भीती बाळगण्याऐवजी आपल्याला काय हवे काय नको हे सांगण्यांसाठी त्यांचा अखंड किलबिलाट सुरू राहतो. त्यांची ही अनोखी भाषा आता पर्यावरणप्रेमींनी आत्मसात केली आहे. त्यांच्या लकबी, त्यांच्या जेवणाचा वेळा लक्षात घेत पक्षी निरीक्षक त्यांच्या नोंदी ठेवत आहे.

धर्मशाळेचे कुणाल देशमुख, अप्पा कोरडे आदी रोज या ठिकाणी येऊन शाळा फुलवत आहेत. तसेच क्लबचे प्रा. आनंद बोरा व त्यांचे सहकारी वर्ग नियमित सुरू रहावेत यासाठी प्रयत्नशील आहेत.

कावळा, चिमणी ते नाईट हेरॉनची हजेरी

सकाळी सात वाजेपासून पक्ष्यांची किलबिल सुरू होते. शाळेत कावळा, चिमणी, कोकीळ यांच्यासोबत सध्या धोबी, साळुंकी, बुलबुल, वटवटय़ा, कबुतर, गाय बगळा, नाईट हेरॉन यांनीही हजेरी लावली आहे. वर्गात शांत बसतील ती मुले कसली, याचा प्रत्यय या शाळेतही येतो. खाद्य म्हणून ठेवलेल्या वाटीतील पाणी असो वा शेंगदाणे, फरसाण, गाठी शेव. दुसऱ्याच्या वाटीतील खाद्य फस्त करण्याकडे पक्ष्यांचा कल असतो. परिसरात अशोक व पिंपळाची मोठी झाडे आहेत. त्यावर पानपक्षी, गायबगळा, नाईट हेरॉल्ड, पॉन्ड हेरॉल्ड पक्ष्यांची १४ घरटी सापडली आहेत.

पर्यावरणप्रेमींनी सहभागी व्हावे

उन्हाळ्यात पक्ष्यांना दाणा आणि पाण्याची सोय व्हावी तसेच विविध पक्ष्यांची माहिती होऊन त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न व्हावेत, या उद्देशाने पक्ष्यांची शाळा हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आठ दिवसांत दहा पक्ष्यांनी शाळेत हजेरी लावली. या ठिकाणी रोज आठ ते दहा या वेळेत संस्थेचे पदाधिकारी काम करतात. ज्यांना वेळ नाही, मात्र उपक्रमात सहभागी व्हायचे आहे, त्यांनी शनिवारी, रविवारी दोन तास उपस्थित रहावे. त्यांनाही पर्यावरणविषयक प्रशिक्षण देण्यात येईल.

प्रा. आनंद बोरा (अध्यक्ष, नेचर क्लब ऑफ नाशिक)

First Published on April 21, 2017 12:28 am

Web Title: sant gadge baba ashram nashik birds