तीव्र टंचाईची पाश्र्वभूमी आणि भविष्यात पुन्हा अशी स्थिती निर्माण होऊ नये म्हणून नाशिक जिल्ह्य़ातील सप्तशृंग गडावर सप्तशृंगीदेवी व्यवस्थापनाच्या वतीने विविध कुंडांच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले असून आजपर्यंत २६ कुंडांची दुरूस्ती करण्यात आली आहे. या कुंडांमध्ये पावसाळ्यात पाणी साठवून गडावरील जलसाटय़ात वाढ करण्याचा व्यवस्थापनाचा मानस आहे.
व्यवस्थापनाने २२ महिन्यांपासून कुंडांच्या दुरूस्तीचे काम सुरू केले आहे. शिवालय तळ्याची स्वच्छता केल्याने त्याचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. पर्यटकांना शिवालयातील मासे, बदक, राजहंस आकर्षित करत आहेत. गडावर अनेक कुंड असून, बहुतेक कुंड बुजले गेले आहेत. या सर्व कुंडांमधील माती बाजूला करून त्यांना पुन्हा पूर्वीच्या रूपात आणल्यास गडावरील पाण्याची समस्या कायमची मिटू शकेल हे ध्यानात घेऊन व्यवस्थापनाने कुंडांच्या दुरूस्तीस सुरूवात केली आहे. आतापर्यंत लक्ष्मी, विटाळसी, खरदुले, गणेश, पंजाबी, स्मशान, अहिल्या, गंगाकुंड, यमुना, बालाकुंड, तांबूलकुंड, देवनळी, परशुराम अशा २६ कुंडांची दुरूस्ती करण्यात आली आहे. जाणकारांच्या मते गडावर १०८ कुंड आहेत. पावसाळ्यात या कुंडांमध्ये पाणी साठल्यानंतर ते पाझरल्यावर तलावाच्या पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे संभाव्य पाणी टंचाईला आळा बसण्यास मदत होईल, असे मत व्यवस्थापनाच्या वतीने लेखाधिकारी भगवान नेरकर यांनी व्यक्त केले.