पेठ, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर अशा काही तालुक्यांचा अपवाद वगळता मंगळवारी जिल्ह्यात इतरत्र पावसाचा जोर ओसरला आहे. रविवारी विक्रमी पावसाची नोंद करणाऱ्या नाशिकमध्ये मागील चोवीस तासांत सरासरी ३१.८ मिलिमीटर पाऊस झाला. या पावसाने धरणांच्या जलसाठय़ात लक्षणीय वाढ झाली. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ३१३२ दशलक्ष घनफूट जलसाठा झाला आहे. समाधानकारक पावसामुळे पेरणीच्या कामांनीही जोर पकडला आहे.
ऐन पावसाळ्यात टंचाई व दुष्काळाला तोंड देणाऱ्या नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाने एक-दोन दिवसांत संपूर्ण चित्र पालटले. रविवारी त्याने अशी काही हजेरी लावली की, आतापर्यंतचा सर्व अनुशेष भरून काढला. सलग चोवीस तास संततधार झाल्यामुळे गंगापूर धरणातून पाणी न सोडताही गोदावरी नदी दुथडी भरून वाहिली. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर गोदावरीच्या पाणी पातळीत घट झाली. पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या चारचाकी मोटारी व दुचाकी काढण्याचे काम अग्निशमन दलाने पूर्ण केले. महापालिकेने पुढील काळात उद्भवू शकणाऱ्या संभाव्य आपत्तीची चाचपणी करत तयारी केली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने शोध व बचाव कार्यासाठी सेवाभावी संस्थांचे पथक तयार केले आहे.
मागील चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ३१.७७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मागील दोन दिवसांचा विचार करता हे प्रमाण कमी आहे. पेठ (११७ मिलिमीटर), सुरगाणा (९३) त्र्यंबकेश्वर (८९) आणि इगतपुरी (६१) या चार तालुक्यांत पावसाचा जोर होता. उर्वरित भागात त्याचा जोर ओसरला. नाशिक तालुक्यात २८, दिंडोरी २३, निफाड व नांदगाव प्रत्येकी ७, सिन्नर १३, चांदवड ४, देवळा २, येवला ४, मालेगाव ५, बागलाण व कळवण प्रत्येकी ११ मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यातील सर्व भागात कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. ग्रामीण भागात पावसाअभावी रखडलेली पेरणीची कामे सुरू झाल्याचे चित्र आहे.
पावसामुळे धरणांच्या जलसाठय़ात समाधानकारक वाढ झाली आहे. पालखेड धरणातून १९ हजार ५००, दारणा धरणातून ८०२५ क्युसेस, चणकापूर १११२ तर नांदूरमध्यमेश्वरमधून ११ हजार ९०६ क्युसेस पाणी सोडण्यात आले आहे. नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ५५ टक्के भरले. काश्यपी २२ तर गौतमी गोदावरीमध्ये २१ टक्के झाला. पालखेड ९२ टक्के, करंजवण २७, वाघाड ३४, ओझरखेड १३, पुणेगाव ३६, तिसगाव २, दारणा ६७, भावली ७४, मुकणे १२, वालदेवी ३६, नांदूरमध्यमेश्वर ४४, कडवा ६९, आळंदी ६४, भोजापूर ३९, चणकापूर ४८, पुनद ४९, हरणबारी ४६, केळझर ३२ टक्के जलसाठा झाला.
काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील १७ धरणे कोरडीठाक झाली होती. या पावसाने रिक्त राहणाऱ्या धरणांची संख्या केवळ दोनवर आली
आहे. सद्य:स्थितीत नागासाक्या व गिरणा या धरणांमध्ये जलसाठा झालेला नाही.

गतवर्षीपेक्षा १२ टक्के अधिक जलसाठा
यंदा महिनाभर दडी मारणाऱ्या पावसाने दोन ते तीन दिवसांत सर्व कसर भरून काढल्याने लहान-मोठय़ा २३ प्रकल्पातील जलसाठा २९ टक्क्यांवर पोहोचला आहे. गतवर्षी याच काळात जलसाठय़ाचे हे प्रमाण १७ टक्के होते. दहा दिवसांपूर्वी उपरोक्त प्रकल्पातील जलसाठा अवघ्या तीन टक्क्यांवर आला होता. जवळपास १७ धरणे कोरडी झाली होती. दमदार पावसाने जलसाठय़ाचे प्रमाण कमालीचे विस्तारत थेट २९ टक्क्यांवर गेले आहे. सध्या जिल्ह्यातील उपरोक्त प्रकल्पांमध्ये १९ हजार ०५५ दशलक्ष घनफूट जलसाठा आहे. मागील वर्षी १२ जुलै रोजी हे प्रमाण ११ हजार २५६ दशलक्ष घनफूट होते. म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये ७ हजार ७९९ दशलक्ष घनफूट अधिक जलसाठा आहे.

ब्राह्मणी नदीच्या पुलावर कसरत
गिरणारे लगतच्या दुगाव ते आळंदी धरण रस्त्यावर ब्राह्मणी नदीच्या पुराचे पाणी पुलावरून वाहत असल्याने १० ते १२ गावांतील ग्रामस्थांना कसरत करत पाण्यातून मार्ग काढावा काढत आहे. या पुलावरून वाहन नेता येत नसल्याने पायी मार्गक्रमण करणे भाग पडते. एखाद्याला वाहनाने पलीकडे जायचे झाल्यास ३० किलोमीटरचा वळसा घालावा लागतो. मागील दोन ते तीन दिवसांत आळंदी धरण परिसरात मुसळधार पाऊस झाला. यामुळे ब्राह्मणी नदीला पूर आला असून त्याचा फटका या परिसरातील जवळगाव, वडगाव, करवंदे वाडी, साकोरे वाडी, दाभूर आदी गावांना बसला आहे. दुगाव ते आळंदी धरण रस्त्यावर ब्राह्मणी नदीवर पूल आहे. ज्यांना वाहनांनी मार्गस्थ व्हायचे आहे, त्यांना मुंगसरा, दरी भागातून ३० किलोमीटरचा वळसा घालणे क्रमप्राप्त ठरले आहे.