ठेकेदाराचे देयक मंजूर करण्यासाठी २२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडले गेलेले सार्वजनिक बांधकाम उत्तर विभाग कार्यालयातील तत्कालीन कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर आणि तत्कालीन शाखा अभियंता जगदीश वाघ यांची जिल्हा सत्र न्यायालयाने ठोस पुराव्याअभावी लाचेच्या गुन्ह्य़ातून मुक्तता केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ३० एप्रिल २०१३ रोजी लाच घेताना दोघांना पकडले होते. तपासात उभयतांकडे सापडलेल्या कोटय़वधीच्या मालमत्तेमुळे संपूर्ण राज्यात हे प्रकरण चांगलेच गाजले होते.

लाच प्रकरणात एप्रिल २०१३ मध्ये चिखलीकर, वाघ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास यंत्रणेने दोन हजार पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. सुनावणी दरम्यान १२ जुलै २०१८ रोजी न्यायालयातून लाचखोरीच्या प्रकरणातील मूळ तक्रारदाराच्या तक्रारीची फाईल गहाळ झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशान्वये या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला गेला. लाचेच्या गुन्ह्य़ात दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाला. सरकार पक्षाकडून विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी कामकाज पाहिले तर बचाव पक्षाकडून मुंबई, पुणे येथील वकिलांनी काम पाहिले. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाच्या न्याय निवाडय़ांचा ऊहापोह झाला. या खटल्यात सुनावणी पूर्ण होऊन सोमवारी न्यायालयाने निकाल दिला. ठोस पुरावा सिद्ध न झाल्याने चिखलीकर, वाघ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

लाचेची मागणी झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत कारवाई, सापळा रचणे अपेक्षित असते. या प्रकरणात तसे झाले नसल्याचा मुद्दा मांडला गेला. या गुन्ह्य़ाचे तपास अधिकारी म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन उपअधीक्षक एस. जे. पाटील यांनी काम केले होते. मध्यंतरी त्यांचे निधन झाले. यामुळे न्यायालयासमोर ते येऊ शकले नाहीत. चिखलीकर विरुद्ध कारवाईत संबंधित विभागाच्या मंत्र्यांची परवानगी आवश्यक होती. पण बांधकाम विभागाच्या तत्कालीन सचिवांनी परवानगी दिली. हे मुद्दे महत्त्वाचे ठरले.

न्यायालयीन निर्णयाची प्रत अद्याप मिळालेली नाही. ही प्रत मिळाल्यावर विधी विभागाकडे पाठविली जाईल. न्यायालयीन निकालावर अपील करता येईल काय, यावर कायदेतज्ज्ञांचे मत घेतले जाईल. विधि विभागाच्या मार्गदर्शनानुसार पुढील कार्यवाही होईल.- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक.

अपसंपदा गुन्ह्य़ाची सुनावणी बाकी

लाच प्रकरणात अटक झाल्यानंतर चिखलीकरकडे रोकड आणि राज्यातील बहुतेक भागात स्थावर मालमत्ता अशी सुमारे १५ कोटींहून अधिकची संपत्ती आढळली. शाखा अभियंता जगदीश वाघकडेही पावणेतीन कोटींची मालमत्ता आढळली होती. चिखलीकरच्या घराच्या झडतीत आधीच दोन कोटी ९६ लाख रुपये रोख, २७ तोळे सोने आणि मालमत्तेची मोठय़ा प्रमाणात कागदपत्रे सापडली होती. बँकेतील ‘लॉकर’च्या तपासणीत साडेचार कोटी रुपये रोख आणि चार किलो २५० ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्किटे सापडली. चिखलीकरप्रमाणेच वाघ या शाखा अभियंत्यानेही स्थावर मालमत्तेत मोठी गुंतवणूक केली. त्याच्याकडे ४७ लाख रुपये रोख आणि एक किलो ११७ ग्रॅम सोने आढळून आले. उत्पन्नापेक्षा ज्ञात स्रोतांपेक्षा मोठय़ा प्रमाणात मालमत्ता संपादित केल्याचे तपासात उघड झाले. दोन अभियंत्यांकडे मिळालेल्या मालमत्तेने तपास यंत्रणाही चक्रावली होती. या प्रक्रियेत संबंधितांना मदत केल्यावरून चिखलीकर आणि त्याची पत्नी स्वाती तसेच वाघ आणि पत्नी दीपिका यांच्याविरोधात अपसंपदेचे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्य़ाची सुनावणी सुरू होणे बाकी असल्याचे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी सांगितले.