News Flash

व्याधिग्रस्त, अंथरुणाला खिळलेल्यांच्या जीवनात ‘दिलासा’

७० रुग्णांचे पालकत्व

नाशिकमधील जगताप दाम्पत्याचे मोलाचे कार्य; ७० रुग्णांचे पालकत्व

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात पती-पत्नी दोघेही नोकरी करणारे असतील, तर एकवेळ लहान मुलांना पाळणाघरात ठेवून ते बाहेर पडू शकतात. परंतु घरात अंथरुणाला खिळलेले किंवा व्याधिग्रस्त आई-वडील असतील, तर त्यांचे काय, त्यांना कोणाकडे ठेवणार, अशा अवस्थेत त्यांना सांभाळण्यास कोण तयार होणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठीच जणू काही नाशिक येथील दिलासा प्रतिष्ठान संचलित ‘दिलासा केअर सेंटर’चा जन्म झाला आहे.

शहरातील सिडको कार्यालयामागे पारिजातनगरमध्ये दिलासा संस्था कार्यरत आहे. अंथरुणाला खिळलेल्या, व्याधिग्रस्त, कुठल्याही कारणास्तव अपंगत्व आलेले, अर्धागवायूने त्रस्त, मनोरुग्ण, व्यसनग्रस्त अशा सर्व प्रकारच्या रुग्णांची शुश्रूषा येथे केली जाते. सतीश व उज्ज्वला हे जगताप दाम्पत्य दिलासाचे प्रमुख आपल्या १५ सहकारी कर्मचाऱ्यांसह सध्या ७० रुग्णांचे पालकत्व यशस्वीपणे पार पाडत आहेत. संस्थेतील रुग्णांची दररोज वैद्यकीय तपासणी केली जाते. आवश्यकता भासल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येते. सुधारणा झालेले शेकडो रुग्ण पुन्हा आपआपल्या कुटुंबात रमले आहेत. २०११ मध्ये नोंदणीकृत झालेल्या या संस्थेत पसारा दिवसेंदिवस वाढतच आहे. जागा कमी असल्याने रुग्णांच्या संख्येवर संस्थेस र्निबध ठेवणे भाग पडते. त्यामुळे स्वत:च्या मालकीची इमारत बांधण्याचे संस्थेचे स्वप्न आहे. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर गुजरात, राजस्थान येथील व्याधिग्रस्त आणि अंथरुणाला खिळलेल्यांचा मुक्कामही दिलासामध्ये पाहावयास मिळतो. अपवाद वगळता दिलासामधील सर्व रुग्ण सत्तरी ओलांडलेले आहेत. त्यात रस्त्यावरील निराधारापासून निवृत्त जवान, रिझव्‍‌र्ह बँकेचे अधिकारी, कंपन्यांमधील अधिकारी, आदर्श शिक्षक अशा सर्वाचा समावेश आहे. या ठिकाणी रुग्णांना केवळ निवाराच दिला जातो असे नव्हे, तर त्यांना कोणतीच उणीव भासू नये याची काळजी घेतली जाते. अगदी न्याहरी, जेवणापासून, तर त्यांच्या एकटेपणावर मात करण्यासाठी विविध खेळांचा आधार घेतला जातो. दर १५ तारखेला त्या त्या महिन्यातील जन्मतारीख असलेल्या रुग्णांचा वाढदिवस साजरा केला जातो. दिलासामध्ये रुग्णाला दाखल केल्यावर पुन्हा त्यांच्याकडे ढुंकूनही न पाहणारेही अनेक नातेवाईक आहेत. केवळ त्यांच्या मदतीसाठी काही ठरावीक रक्कम पाठवून ते मोकळे होतात. अशा रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर पुढील सर्व विधी दिलासालाच करावे लागतात. आजपर्यंत अशा प्रकारे ५०पेक्षा अधिक जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत.

आपुलकीचा ‘दिलासा’

संस्थेला शासनाकडून कोणत्याही प्रकारचे अनुदान मिळत नाही. संस्थेचा महिन्याचा सर्व खर्च साडेतीन लाखांच्या घरात जातो. रुग्णांच्या नातेवाईकांकडून मिळणारी आर्थिक मदत, विविध सामाजिक संस्था, औद्योगिक कंपन्या तसेच व्यक्तिगत स्वरूपात मदतीसाठी पुढे येणाऱ्यांच्या बळावर संस्थेचा कारभार सुरू आहे. संस्थेत दाखल होणाऱ्या रुग्णांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी दिलासाला समाजातील दानशूरांकडून मदतीची गरज आहे.

ही मदत आर्थिकसह वस्तुरूप देणगी, इमारत निधी, अन्नधान्य, अंथरुण-पांघरुण, औषधे, स्वच्छता व स्नानगृहाशी संबंधित साधने, किराणा, भाजीपाला, फळांचा पुरवठा अशा कोणत्याही स्वरूपात करता येऊ शकेल. अशा मदतीच्या प्रतीक्षेत दिलासा आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2016 1:27 am

Web Title: satish jagtap dilasa care center at sarva karyeshu sarvada
Next Stories
1 १००९ नाशिकमध्ये शाळाबाह्य मुले
2 सिन्नरमध्ये खडूंच्या कलाकृतींचे प्रदर्शन
3 दिडोरी तालुक्यातील बालिका हत्येचे गूढ कायम
Just Now!
X