सातपूर वाहने तोडफोड प्रकरणात काही जणांची चौकशी

सातपूर कॉलनी परिसरात चारचाकी वाहनांची तोडफोड करत शहराला अशांततेच्या गर्तेत ढकलणाऱ्या संशयितांच्या शोधात सीसी टीव्ही कॅमेऱ्यांच्या अस्पष्ट चित्रणामुळे काहीसा अडसर निर्माण झाला आहे. धुडगूस घालणाऱ्या संशयितांचा युद्ध पातळीवर शोध घेतला जात असून काहींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. परंतु, गुरूवारी दुपापर्यंत ठोस धागेदोरे तपास यंत्रणेच्या हाती लागू शकले नव्हते. दरम्यान, सातपूरच्या घटनेच्या पाश्र्वभूमीवर, पोलिसांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पुन्हा धडक कारवाई सुरू करत शेकडो टवाळखोरांवर कारवाई केली. तसेच गुन्हेगारांसह हॉटेल व बार तपासणी, वाहनधारकांवर कारवाईचे सत्र आरंभण्यात आले आहे.

कामगार वसाहतीचा भाग असलेल्या सातपूर कॉलनी परिसरात दुचाकीवरून आलेल्या दोन संशयितांनी दीड किलोमीटरच्या मार्गावरील ११ चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्या होत्या. साईबाबा मंदिर, शिवनेरी उद्यान, कामगार कल्याण भवन परिसर, राजमुद्रा चौक, शिवनेरी चौकात हा प्रकार घडला. गुन्हेगारांवरील कारवाईमुळे शहरात प्रथमच शांतता प्रस्थापित होत असताना या घटनेमुळे त्यास गालबोट लागले. वाहन तोडफोडीचा प्रकार बुधवारी सकाळी लक्षात आल्यावर शहरात खळबळ उडाली. या प्रकरणी वाहनधारकांनी दिलेल्या तक्रारीनुसार सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेची दखल घेऊन पोलिसांनी तपासाला गती दिली. परिसरात जे सीसी टीव्ही कॅमेरे आहेत, त्यांचे चित्रण मिळविण्यात आले. प्रत्यक्षदर्शीकडून माहिती संकलित करण्यात आली. त्या आधारे वाहनांच्या तोडफोडीत दोन जणांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. अंधारात घडलेल्या या घटनेचे सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण सुस्पष्ट नाही. यामुळे संशयितांची त्वरेने ओळख पटविता आलेली नाही. या चित्रणावर प्रक्रिया करून ते सुस्पष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. दुसरीकडे इतर अंगाने या घटनेचा तपास सुरू असून काहींना ताब्यातही घेण्यात आले. संबंधितांच्या चौकशीतून

धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न आहे. गेल्या काही महिन्यांत पोलिसांनी टिप्पर गँग, कुंदन परदेशी, पी. एल. ग्रुपच्या सदस्यांवर कारवाई केली आहे. वाहनांच्या तोडफोडीमागे उपरोक्त टोळीतील कोणाचा सहभाग आहे काय, या अंगाने तपास सुरू आहे.

पोलीस यंत्रणा रस्त्यावर

नाशिक शहराला ऑगस्टच्या प्रारंभी महापुराचा तडाखा बसला होता. नैसर्गिक आपत्तीच्या पाश्र्वभूमीवर, शहरात राबविली जाणारी धडक मोहीम काही काळासाठी स्थगित करण्यात आली होती. सातपूरच्या घटनेनंतर बुधवारी रात्रीपासून पुन्हा एकदा ही मोहीम सुरू करण्यात आली. शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या अखत्यारीत रात्री टवाळखोर, नियमबाह्यपणे वाहने चालविणे, आरोपींची तपासणी, हॉटेल व बीअर बारची तपासणी आणि काही ठिकाणी छापे टाकण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे व लक्ष्मीकांत पाटील यांनी दिली. त्या अंतर्गत शेकडो टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली. परिमंडळ दोनमध्ये १२९ टवाळखोर, २९६ वाहनधारक, ३१ आरोपींची तपासणी, ४७ हॉटेल व १५ बीअर बारची तपासणी आणि तीन ठिकाणी छापे टाकण्यात आले.

गुन्हेगारी रोखण्याची मनसेची मागणी

गेल्या काही दिवसात सातपूर परिसरात गुन्हेगारी मोठय़ा प्रमाणात वाढली असून त्यावर तातडीने नियंत्रण आणावे, अशी मागणी मनसेने केली आहे. या बाबतचे निवेदन महापालिका स्थायी समितीचे सभापती सलीम शेख यांनी पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांना दिले. काही दिवसांपूर्वी समतानगर व जुनी सातपूर कॉलनी भागात आठ ते दहा घरफोडय़ांचे प्रकार घडले. त्यानंतर याच परिसरातील वाहनांची तोडफोड केली गेली. या घडामोडींनी पोलीस यंत्रणेला थेट आव्हान दिले आहे. अशा समाजकंटकांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. या घटनेमागे काही राजकीय षडयंत्र नाही ना, असा प्रश्नही निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे.