विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आणि दप्तराच्या ओझ्यातून एक दिवस का होईना सुटका करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेतला असून ‘दप्तरमुक्त शनिवार’ हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे. राज्यात केवळ नाशिक जिल्ह्य़ात हा उपक्रम सुरू आहे. जिल्ह्य़ातील तीन हजार ३३० शाळांमधील दोन लाख ७५ हजार विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले आहेत. या माध्यमातून विद्यार्थी तसेच शिक्षकांच्या सृजनशीलतेला वाव मिळत असून वेगवेगळ्या उपक्रमांची यामध्ये भर पडत आहे.

जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी काही प्रयोगशील शिक्षक वेगवेगळे उपक्रम शालेय स्तरावर राबवत असतात. विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वाढविण्यासाठी दृक आणि श्राव्य माध्यमाच्या वापरावर भर देत खेळ, गाणी, नाटक अशा वेगवेगळ्या पर्यायाची निवड करून विद्यार्थ्यांचे भाषिक, सांख्यिकी कौशल्य वाढीसाठी प्रयत्न होतात. परंतु, हे उपक्रम एका ठराविक शाळेपुरते मर्यादित असतात. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ‘दप्तरमुक्त शनिवार’ ही संकल्पना मांडली.

यामध्ये भाषा, गणित, विज्ञान, इतिहाससह अन्य विषयांचे सखोल ज्ञान विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी शनिवारचा दिवस वेगवेगळ्या उपक्रमांसाठी राखीव ठेवण्यात आला. विद्यार्थ्यांचा प्रात्यक्षिकांकडे असणारा कल पाहता त्यांना दृक-श्राव्य माध्यमातून वेगवेगळ्या संकल्पना समजावून देण्याचे नियोजन करण्यात आले. यासाठी शालेय स्तरावर उपलब्ध साधनसामग्री, शिक्षकांची कल्पनाशक्ती, त्यांची मानसिकता यावर त्या उपक्रमाची आखणी सुरू आहे. यामध्ये शिक्षण गाभ्यातील भारतीय चळवळीचा इतिहास, भारतीय संविधानात्मक जबाबदाऱ्यांची जाणीव, राष्ट्रीय अस्मिता जोपासण्यासाठी आवश्यक आशय, भारताचा सामाईक सांस्कृतिक वारसा, समानतावाद, धर्मनिरपेक्षता, स्त्री-पुरूष समानता, पर्यावरण संरक्षण, शैक्षणिक दृष्टीचा परिपोष आदींचा विचार करत वेगवेगळ्या संकल्पना मांडण्यात आल्या आहेत.

प्राथमिक शाळेत वर्गनिहाय वाचू या लिहूया, चित्रवर्णन, भाषा पेटी, भेळ तयार करणे, शब्दांची बाग, माझा शब्द परिवार, गणितीय संकल्पनांमध्ये भौमितीक आकार, सांख्यिकी, गणितीय खेळ, इंग्रजीमध्ये इंग्रजी संभाषणासह गोष्ट सांगणे असे विविध उपक्रम सुरू आहेत. विद्यार्थी शनिवारी शाळेत येऊन आपल्या आवडीच्या विषयावर एखादा उपक्रम स्वत तयार करून प्रकल्पाच्या माध्यमातून अन्य विद्यार्थ्यांना ती संकल्पना समजावून देत आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागत असल्याचे शिक्षणाधिकारी वैशाली झणकर यांनी सांगितले.