सॅटरडे-संडे कबड्डी लीग स्पर्धेच्या अंतिम सामन्यात साई पांढुर्लीने क्रीडा प्रबोधिनी नाशिकचा १३ विरुध्द ९ असा चार गुणांनी निसटता पराभव करत विजेतेपद पटकावले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक भगवान गवळी, युवा क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष याज्ञिक शिंदे, स्पर्धा निरीक्षक सतीश सूर्यवंशी, पंच प्रमुख राजेंद्र निकुंभ आदींच्या उपस्थितीत झाले.

याज्ञिक शिंदे युवा क्रीडा प्रतिष्ठानच्यावतीने नेहरु युवा केंद्राच्या सहकार्याने नाशिक जिल्हा कबड्डी संघटनेच्या मान्यतेने आणि क्रीडा प्रबोधिनीच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यात जिल्ह्यातील १६ निमंत्रित संघांनी सहभाग घेतला. या संघांची चार गटात विभागणी करण्यात आली. साखळीतील २४ सामने व बाद पध्दतीतील सात असे एकूण ३१ खेळविण्यात आले. पहिल्या रोमहर्षक उपांत्य फेरीच्या लढतीत साई पांढुर्लीच्या संघाने नाशिक ग्रामीण पोलीस संघाचा ५-५ चढायांमध्ये २९ विरुध्द २६ असा ३ गुणांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य फेरीत क्रीडा प्रबोधिनी नाशिकने छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळाचा पराभव केला. अंतिम फेरीच्या सामन्यात वासिम शेख, कलीम शेख, नीलेश डगळे या साई पांढुर्लीच्या खेळाडूंनी क्रीडा प्रबोधिनीच्या संघाला सुरूवातीपासून डोके वर काढू दिले नाही. मध्यंतरानंतर राकेश खैरनार, कुंदन सोनवणे, नीलेश चौधरी या क्रीडा प्रबोधिनीच्या खेळाडूंनी खोलवर चढाई करत आघाडी भरून काढली. परंतु, निर्णायक क्षणी कुंदन सोनवणेची झालेली पकड सामन्याला कलाटणी देऊन गेली. हा सामना साई पांढुर्ली संघाने १३ विरुध्द ९ असा चार गुणांनी जिंकून पहिल्या सॅटरडे-संडे कबड्डी लीगचे अजिंक्यपद पटकावले. सामन्यातील सवरेत्कृष्ट खेळाडूचा बहुमान साई पांढुर्लीच्या कलीम शेखने तर उत्कृष्ट पकडचा बहुमान नाशिक ग्रामीणच्या धनंजय जाधवने पटकावला. स्पर्धा यशस्वीततेसाठी प्रशांत भाबड, विलास पाटील, शरद पाटील, चिन्मय देशपांडे आदींनी प्रयत्न केले.