मेट चंद्राची गावातील महिलांकडून ‘त्या’ दिवसातील चित्र बदलण्याचा प्रयत्न

नाशिक :  दर महिन्यातील ‘ते चार दिवस’ हा विषय महिलांच्या लेखी उघडपणे चर्चा न करण्याचा. परंतु त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मेट चंद्राची या गावातील महिलांनीच हे चित्र बदलण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आदिवासी भागातील महिला आणि मुलींच्या आरोग्यासाठी गावातील महिलांनी बचत गटाची उभारणी करत अल्प दरात त्या चार दिवसांसाठी ‘सॅनिटरी नॅपकिन’ चा पर्याय गावातच खुला करून दिला आहे. या माध्यमातून त्या आर्थिकदृष्टया सक्षम होत असून आदिवासी दुर्गम भागात त्यांचा पोहचण्याचा प्रयत्न आहे.

महिलांच्या आरोग्यासाठी आरोग्य विभाग वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून सक्रिय असल्या तरी काही अंधश्रद्धा, स्त्रीसुलभ लज्जा आदी कारणांमुळे महिला आरोग्य किंवा आरोग्यविषयक अडचणींकडे दुर्लक्ष करतात. हा धागा पकडत बॉश कंपनीने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मेट चंद्राची गाव दत्तक घेतले. गावात मूलभूत सोयी सुविधा देतांना महिलांच्या हाताला काम मिळावे यासाठी सीएसआरचा काही निधी उपलब्ध करून दिला. गावात सद्यस्थितीत दोन बचत गट सक्रिय आहेत. या माध्यमातून गावातील २० महिलांनी लघुउद्योजक म्हणून वेगळी वाट शोधली आहे.

बचत गटातील बहुतांश महिला निरक्षर असून १० वीपर्यंत शिक्षण काहींनी घेतले आहे. शिक्षण आणि अनुभवाच्या शिदोरीतून महिलांचे आरोग्य या विषयी काम करण्यास महालक्ष्मी बचत गटाने प्राधान्य दिल्याचे गटाच्या अध्यक्षा सुनंदा चंद्रे सांगतात. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे मार्गदर्शन, बॉश कंपनीच्या आर्थिक साहाय्याने महिलांनी सॅनिटरी पॅड बनविण्याचे प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणाच्या आधारे महिलांनी ‘मैत्रीण सॅनिटरी पॅड’ हे स्वतचे उत्पादन बाजारपेठेत आणले आहे.  मागील वर्षी राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्ती अभियान अंतर्गत भरविलेल्या ‘गोदाई’ प्रदर्शनात या मैत्रीण पॅडने ग्राहकांना आकर्षित केले. रासायनिक पदार्थाच्या वापरापेक्षा र्निजतुकीकरणासाठी अतिनीलकिरणांचा केलेला वापर यामुळे हे पॅड बाजारपेठेतील अन्य पॅडच्या तुलनेत ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. या उत्पादनाला ग्राहकांचा वाढता प्रतिसाद पाहता महिलांनी दिवसाचे आठ ते १० तास या कामात स्वतला झोकून दिले आहे.

यंदाही गोदाई प्रदर्शनात बचत गटाचा कक्ष लावला आहे.  आदिवासी भागातील महिलांना बाजारपेठेतील पॅड परवडण्यासारखे नसल्याने गावातच हे पॅड ३०, ३५ आणि ४० रुपयांपर्यंत उपलब्ध करून देण्यात आले. गावातील शाळा-आश्रमशाळाांमध्येही पॅड वितरणाविषयी बोलणे झाल्याचे चंद्रे सांगतात. त्यांना वंदना कोरडे यांच्यासह अन्य महिलांनी मदत केल्याने हे काम दिवसागणिक वाढत आहे.