जिल्ह्य़ात चार लाख ३६ हजार मुखपट्टीची निर्मिती 

नाशिक : उन्हाळ्यात वाळवणाच्या पदार्थातून लाखो रुपयांची उलाढाल करणाऱ्या बचत गटांपुढे यंदा करोनाच्या संकटाने पेच निर्माण केला होता. परंतु, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी ‘आपत्तीतून इष्टापत्ती’ साधत बचत गटातील महिलांना बदललेल्या परिस्थितीचा अंदाज घेत ‘मुखपट्टी’ तयार करण्याचा सल्ला दिला.

गटाच्या माध्यमातून सुरू झालेले छोटेखानी काम जिल्ह्य़ात लघुउद्योगात परीवर्तीत झाले असून २५३ बचत गट उपक्रमाशी जोडले गेले. चार लाख ३६ हजार मुखपट्टी तयार करत गटातील महिलांनी तब्बल ४२ लाख ५५ हजाराचे उत्पन्न मिळविले आहे.

उन्हाळ्यात वाळवण तयार करून लाखो रुपयांची उलाढाल करणाऱ्या बचत गटाच्या हातातील काम गेले. गटातील महिलांच्या उपजिविकेचा प्रश्न निर्माण झाला. बनसोड यांनी गटातील महिलांना ग्रामस्तरावर  मुखपट्टी तयार करण्याचा सल्ला दिला. मुखपट्टी तयार करा आणि विका हा कानमंत्र मिळाल्याने गटातील महिलांमध्ये उर्जा निर्माण झाली. जिल्ह्य़ातील २५३ बचत गटांनी यात सहभाग घेतला. आतापर्यंत चार लाख ३३ हजार मुखपट्टय़ांची विक्री झाली असून ४२ लाख ५५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

दरम्यान, जिल्ह्य़ातील १५ तालुक्यात हा उपक्रम यशस्वीपणे सुरू असून ग्रामीण भागातही मोठय़ा प्रमाणावर मुखपट्टी उपलब्ध झाली आहे. निफाड तालुक्यात आमदार दिलीप बनकर यांनी बचत गटांना कापड आणि दोरा उपलब्ध करून त्यांना आवश्यक तो मोबदला दिला. या मुखपट्टी करोनासाठी लढा देणाऱ्या, प्रबोधन करणाऱ्या जिल्ह्य़ातील साडेतीन हजार आशा, ७३९ आरोग्य सेविका, ३२८ आरोग्य सेवक, नऊ हजार १०६ अंगणवाडी सेविका यांनाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

बचत गटांवर पूर्ण विश्वास

बचत गटांच्या चळवळीवर आणि त्यांच्या कामावर पूर्ण विश्वास आहे. १२ वर्षांपासून मी गटाचे काम जवळून पाहिले आहे. करोना संकट काळात बचत गटाच्या माध्यमातून मोठे काम उभे राहील अशी खात्री होती. आमच्या आवाहनाला महिलांनी प्रतिसाद दिला. त्यांच्या हातांनाही काम मिळाले, रोजगार मिळाला. खास करून त्यांचा आत्मविश्वास वाढला.

– लीना बनसोड (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक)