18 March 2019

News Flash

नागरी कामात कोटय़वधींची बचत

खड्डे बुजविणे, रस्त्यांची दुरुस्ती, नाले सफाई ही कामे छोटय़ा-मोठय़ा स्वरूपात स्वतंत्रपणे दिली जात होती.

शहरातील रस्त्यांची चाललेली दुरुस्ती कामे.

खड्डे दुरुस्ती, नाले सफाईच्या कामांतील गोंधळाला प्रशासनाचा चाप

शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, नाले सफाई, गवत काढणी यांसारख्या कामांतील सावळ्या गोंधळाला  महापालिका प्रशासनाने चाप लावला आहे. त्यामुळे या कामांमध्ये १५ ते २० कोटी रुपयांची बचत झाली आहे.

महापालिका प्रशासनाने सहा महिन्यांत २५ हजार ९०४ लहान-मोठे खड्डे बुजवित रस्त्यांची दुरुस्ती, नाले सफाईची कामे १० कोटी ५४ लाखाच्या खर्चात पूर्णत्वास नेली.  आधीच्या दोन वर्षांत उपरोक्त कामांवर अनुक्रमे ३९ कोटी आणि ३० कोटींहून अधिकचा खर्च झाला होता. त्यात किती खड्डे बुजविले गेले याची स्पष्टता नाही.

खड्डे बुजविणे, रस्त्यांची दुरुस्ती, नाले सफाई ही कामे छोटय़ा-मोठय़ा स्वरूपात स्वतंत्रपणे दिली जात होती. त्या पद्धतीला पूर्णविराम देत उपरोक्त कामे एकत्रितपणे देत प्रत्येक खड्डय़ासह कामाचा हिशेब धरण्यात आला. सहा महिन्यातील खर्च पाहता याद्वारे महापालिकेच्या वार्षिक खर्चात किमान १५ ते २० कोटींची बचत होणार असल्याचा अंदाज आहे.

महापालिका वर्तुळात रस्ते बांधणी हा अनेकांच्या आवडीचा विषय असतो. सत्ताधारी भाजपने मंजूर केलेल्या २५७ कोटींच्या रस्त्यांची कामे पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रद्द केल्यानंतर या विषयावर बरीच चर्चा होत आहे. कामे रद्द झाल्याची खदखद सत्ताधारी-विरोधी सदस्य वारंवार व्यक्त करतात. केवळ रस्तेच नव्हे तर त्यावरील खड्डे बुजविणे, नाले सफाई किंवा गवत काढणीच्या कामांवर दरवर्षी मोठय़ा प्रमाणात निधी खर्च केला जातो. मागील दोन वर्षांत या कामांवर खर्ची पडलेला निधी आणि या वर्षीच्या खर्चाची आकडेवारी पाहिल्यास पालिकेच्या तिजोरीची गळती थांबल्याचे दिसून येते.

एप्रिल ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत खड्डे बुजविणे, डांबरी रस्त्यांची दुरुस्ती, रस्त्यांच्या साईड पट्टय़ांचे गवत काढणे, नाले साफसफाई, रस्ते दुरुस्तीसाठी खडी, मुरूम, ग्रीट पुरविणे, ट्रॅक्टर, जेसीबी, रोलर, डंपर भाडेतत्वावर देणे या कामांवर आतापर्यंत १० कोटी ५४ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

वर्षांतील निम्मा कालावधी अद्याप बाकी आहे. याच पध्दतीने पुढील कामे होतील. त्याचा विचार करता आधीच्या दोन वर्षांच्या तुलनेत या वर्षी उपरोक्त कामांवरील खर्चात १५ ते २० कोटींची बचत होईल. या कामात सुसूत्रता आणल्याने बुजविलेल्या प्रत्येक खड्डय़ाची नोंद पालिकेजवळ आहे.

कामात सुसूत्रता

रस्ते दुरुस्ती कामांसाठी खडी, मुरूम, डांबर साहित्याने बुजविण्यात आलेल्या खड्डय़ांसाठी २०१६-१७ या वर्षांत तब्बल ३९.३९ कोटी तर २०१७-१८ वर्षांत ३० कोटी ३९ लाख रुपये खर्च झाले. खड्डे बुजविण्याचे काम देतांना किती खड्डे बुजवायचे किंवा तत्सम कोणतीही माहिती घेतली जात नव्हती. कंत्राटदाराने सादर केलेले देयक देण्याचे काम केले जात होते. त्यातही हे काम देताना रस्त्यालगतची गवत काढणी, माती उचलणे, नाले सफाई ही कामे स्वतंत्रपणे दिली जात होती. यामुळे मोठा निधी खर्च करून नेमके किती खड्डे बुजले याची स्पष्टता होत नव्हती. या बाबी लक्षात घेऊन आयुक्त मुंढे यांनी या कामात सुसूत्रता आणण्यावर लक्ष केंद्रित केले. स्वतंत्रपणे ही कामे न देता ती सर्व एकत्रितपणे करण्याचे निर्देश दिले. रस्त्यांवरील खड्डे, निकषानुसार तो बुजविणे, त्याचे छायाचित्र काढणे, जिओ टॅगिंग करणे यामुळे या कामाची गुणवत्ता वाढल्याकडे प्रशासन लक्ष वेधत आहे. तसेच त्यावरील खर्च कमी करण्यात यश मिळाले.

First Published on November 2, 2018 3:04 am

Web Title: saving of crores in civic jobs