‘ई हाट’ ची व्यवस्था

उमेद (ग्रामविकास), महिला आर्थिक विकास महामंडळ, आदिवासी आणि अल्पसंख्याक विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून बचत गटातील महिलांच्या उद्योगाला स्थिरता प्राप्त व्हावी यासाठी ‘ई हाट’ व्यवस्था करण्यात आली आहे. या माध्यमातून बचत गटातील महिलांना आपल्या उत्पादनांची जाहिरात ऑनलाइन करून विक्री करण्याची व्यवस्था करून देण्यात आली आहे. नाशिक येथील मालेगाव तसेच निफाड येथून काही बचत गटांनी ऑनलाइन विक्रीसाठी नोंदणी केली आहे.

काही वषांत बचत गटाने पापड, लोणची, मसाले यांची चौकट ओलांडत वेगवेगळ्या क्षेत्रांत पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. या माध्यमातून अनेक चांगली उत्पादने तयार केली जात असून त्यांना हक्काची बाजारपेठ मिळावी याकरिता महिला आणि बालकल्याण विभागाने ‘ई-हाट’चा पर्याय खुला करून दिला आहे. या माध्यमातून बचत गटांच्या निवडक १२ उत्पादनांची निवड करून त्याची ऑनलाइन विक्री आणि घरी माल पोहचविण्याची व्यवस्था अ‍ॅपच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. ऑनलाइन विक्री प्रक्रियेसाठी ‘आपले सरकार’ वेब पोर्टलला जोडून बचत गटाच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या संदर्भात मुंबई येथे नुकतेच प्रशिक्षण झाले. नाशिक जिल्ह्य़ातून मालेगाव येथील दोन महिला प्रतिनिधींनी त्यात सहभाग घेतला. अन्न आणि औषध विभागाचे निकष पूर्ण करत त्यांनी चकली, शंकरपाळे, बेसन लाडू, खारी ही आपली उत्पादनांची माहिती ई-हाटवर विक्रीसाठी टाकली आहे. निफाड येथील एका बचत गटाने बेदाण्यांच्या विक्रीसाठी नोंदणी केली असल्याचे माविमचे जिल्हा समन्वयक अशोक चव्हाण यांनी सांगितले.

दरम्यान, ‘ई-हाट’ संकल्पना चांगली असली तरी अन्न आणि औषध विभागाने दिलेले निकष पूर्ण करण्यास जिल्ह्य़ातील माविमचे केवळ १०० बचत गट पात्र ठरत आहेत. त्यांपैकी केवळ दोन गटांनी यात नोंदणी केली. ही योजना जास्तीतजास्त बचत गटांपर्यंत पोहचावी यासाठी वेगवेगळ्या स्तरांवर प्रशिक्षणाच्या माध्यमातून माहिती देण्यात येत आहे. महिलांना आपल्या उत्पादनांसाठी अन्न आणि औषध विभागाची मान्यता घेण्यास प्रोत्साहित केले जात आहे. प्रशिक्षणात गुणवत्तापूर्ण अन्नासोबत उत्पादनाचा खर्च कमी करत वस्तूची किंमत नियंत्रणात कशी राहील यावर भर देण्यात येत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

योजना केवळ माविमपुरता मर्यादित

ई-हाट ही योजना केवळ महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचत गटातील महिलांपुरती मर्यादित आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांकडे अन्न आणि औषध विभागाची मान्यता असणे गरजेचे असून परवान्यावर दिलेला सांकेतकांवर गटाच्या उत्पादनाची नोंद करण्यात येत आहे. नाशिकमध्ये पापड, कुरडया तयार करणारे बचत गट खूप आहेत. काही नावीन्यपूर्ण उत्पादन करणाऱ्यांच्या शोधात माविम आहे.